![]() |
corona काटकसरीची सवय लावून घ्या: शरद पवार |
'करोना'चं संकट हे आरोग्यविषयक आहे. मात्र, त्यातून बाहेर पडल्यानंतर आर्थिक संकट उंबरठ्यावर आहे. त्याला तोंड देण्याची तयारी आपण आत्तापासूनच करायला हवी. त्यासाठी काही सवयी बदलाव्या लागतील. व्यक्तिगत जीवनात काटकसर करण्याची सवय करून घ्यावी लागेल,' असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यातील जनतेला दिला.
'करोना'च्या साथीमुळं निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पुन्हा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. राज्य सरकार, संबंधित खात्यांचे मंत्री उत्तम काम करत आहेत. त्यांना प्रशासनाची व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची चांगली साथ मिळत आहे. नागरिक म्हणून आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे, असं पवार म्हणाले.
येत्या काळात ओढवू शकणाऱ्या आर्थिक संकटाबद्दलही पवारांनी आपले विचार मांडले. 'करोनाच्या संकटामुळं आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. त्या अनुभवातून आपल्याला पुढील वाटचाल करावी लागणार आहे, असं ते म्हणाले. 'करोनाच्या संकटामुळं अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. उद्योगधंदे, शेती, कारखाने, व्यापार सगळं बंद आहे. याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थव्यवस्थेचा विकासदर पुढील काळात अगदी २ टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याचा विचार आपण आतापासूनच करायला हवा. सवयी बदलाव्या लागतील. वायफळ खर्च बंद करावे लागतील. आता आपल्याकडं वेळ आहे. त्या वेळेचा उपयोग भविष्यातील नियोजनासाठी करायला हवा. वैयक्तिक आयुष्यात, कौटुंबिक पातळीवर, व्यवसायात, जिथं कुठं काम करतोय तिथं या दृष्टीनं खबरदारी घ्यायला हवी. उत्पादकता कशी वाढेल याकडं लक्ष द्यायला हवं,' असा सल्ला पवार यांनी दिला.
0 comments:
Post a Comment
Please add comment