![]() |
योग्य काळजी घ्या अन्यथा परिस्थिती गंभीर होईल- जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा |
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन अनेक देश शिथील करत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी इशारा देताना सांगितलं आहे की, “सर्व देशांनी काळजी घेण्याची गरज आहे. लॉकडाउन लगेचच शिथील न करता टप्प्याटप्प्याने उठवण्याची गरज आहे”. टेड्रोस यांनी यावेळी निर्बंध शिथील करताना काय काळजी घेतली पाहिजे यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. निर्बंध शिथील झाल्यानंतरही लोकांवर लक्ष ठेवण्याची गरज असून आरोग्य यंत्रणाही तयार असली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
“जर पूर्वकळजी घेतली नाही तर परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाउन करावा लागेल,” असंही टेड्रोस यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “जरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी पूर्वीप्रमाणे सगळं काही सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे”.
“करोनाचा प्रादुर्भाव नक्की कमी होईल, पण त्यानंतर जनजीवन पूर्वीप्रमाणे राहणार नाही. आपण घाबरुन जगू शकत नाही, पण त्याचवेळी तयार राहणं गरजेचं आहे. आपण एकीकडे या महामारीशी लढा देत असताना दुसरीकडे अशा साथींचा सामना कऱण्याची तयारीही केली पाहिजे. जगभरातील आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी ही योग्य संधी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्षच करण्यात आलं आहे. आपण करोनापासून जर काही शिकलो आहोत तर ते म्हणजे आरोग्य सेवेत गुंतवणूक करणं अनेकांचा प्राण वाचवू शकतं,” असं टेड्रोस यांनी सांगितलं आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment