coronavirus | मुंबई-पुण्यात खूप काळजी घ्यावी लागणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे |
राज्यात आणि देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. २१ दिवसांच्या कालावधीत लोकांना घरातच थांबावं, असं आवाहनही सरकारकडून वारंवार करण्यात आलं. २१ दिवसांचा लॉकडाउनला अजून सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या १४ दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाउन संपण्याची वाट बघत आहेत. मात्र, देशातील लॉकडाउन शिथिल करण्यात येणार असला, तरी महाराष्ट्रातील लॉकडाउन आणखी लांबणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसं स्पष्ट केलं आहे. “१५ एप्रिलपासून लॉकडाउन संपूर्णपणे शिथिल होईल, असं कुणीही गृहित धरू नये,” असं टोपे यांनी सांगितलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सायंकाळी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,”जगातच करोनाची साथ आलेली आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर लॉकडाउन शिथिल कसा करायचा यासंदर्भात काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे याबाबत केंद्र सरकार अभ्यास करून राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना पाठवत असते. त्यानुषंगाने राज्य सरकार काम करते. त्यामुळे दहा आणि १५ एप्रिलच्या दरम्यान जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा बारकाईनं अभ्यास करून त्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्र सरकारचे सल्लागार यांच्या अनुषंगानं ठरवावं लागेल. परंतु एक निश्चित आहे की, संपूर्ण लॉकडाउन उठेल, असं कुणीही डोक्यात ठेवू नये. शंभर टक्के यामध्ये काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी खूपच जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे लॉकडाउन १५ एप्रिलनंतर शंभर टक्के शिथिलच होईल, असं कुणीही गृहित धरू नये,” असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment