त्याचं मुस्काड फोडलं तर काय चुकलं ? - अभिनेते नाना पाटेकर

त्याचं मुस्काड फोडलं तर काय चुकलं ? - अभिनेते नाना पाटेकर 
“अजूनही वेळ गेलेली नाही शहाणे व्हा. कुतूहल म्हणून घराबाहेर पडू नका. हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. या सर्वांचा परिणाम अगदी वाईट असेल. स्मशानात जाळायला लाकडं शिल्लक राहणार नाही. उगाच बाहेर पडू नका. जेव्हा बाहेरुन तुम्ही घरात जाता तेव्हा स्वत:बरोबर हा रोग घेऊन जाता आणि संपूर्ण कुटुंबाबरोबरच समाजाला धोक्यात घालताय. त्यामुळेच अशावेळी कारण नसताना बाहेर पडणाऱ्यांना दोन लाठ्या मारल्या, मुस्काड फोडलं तर काय चुकलं त्याचं?, असा सवाल उपस्थित करत अभिनेते नाना पाटेकर यांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.
नाना पाटेकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून अगदी हात जोडून लॉकडाउनच्या काळात घराबाहेर न पडण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. सरकारने आपल्या सुरक्षेसाठी निर्बंध घातले आहेत याची जाण असलायला हवी असं नाना म्हणाले. “सरकारने आपल्यावर जे निर्बंध घातले आहेत ते कोणाच्या भल्यासाठी आहेत? आपल्याच भल्यासाठी आहेत ना? आपण बाहेर न जाण्यामुळे सगळं अर्थकारण थांबलयं. याचा सरकारला काही फायदा आहे का? बरं त्याचं कारण आपल्याला माहिती नाही असंही नाही. सगळं माहिती असून सुद्धा मी रस्त्यावर उतरतो. कुतूहल म्हणून काय चाललयं ते पहायला. उगाचच मोटरसायकल काढतो. काहीतरी खोटी कारणं देतो. किती मुर्खपणा आहे हा. बरं हे करत असताना मी केवळ माझा जीव धोक्यात घालत नाही इतरांचाही जीव धोक्यात घालत आहे. आपण सर्वांना वेठीला धरतोय. कसला हा हव्यास हा? तुम्ही बघा घरी बसलाय आणि मी रस्त्यावर आलोय हा मोठेपणा दाखवायला का हे सर्व? आणि अशावेळी दोन लाठ्या पोलिसांनी चढवल्या तर काय चुकलं त्यांचं? पोलीस उगाचच मारताय का? ते हवेत लाठ्या फिरवतायत का? मी उगाचच मोटारसायकल घेऊन चाललोय. गळ्यात कपाळावर रुमाल बांधून. मग पोलिसांनी माझं मुस्काड फोडलं तर काय चुकलं त्याचं?” असा सवाल नानांनी उपस्थित केला आहे.
सर्व यंत्रणा इतके प्रयत्न करत असून ते स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असल्याने खरं तर आपण त्यांचे पाय धरायला हवेत असं मत नानांनी व्यक्त केलं आहे. “पोलीस पण माणसंच आहेत ना. त्यांना नाही का हा रोग होऊ शकत. किती काळजी घेणार ते सुद्धा. सकाळी उठल्यापासून ते घऱाबाहेर आहेत. गरिबांना अन्न पोहचवणं हे पोलिसांचं काम आहे का? नाही ना. पण करतायत ना ते. २४ तासांची ड्युटी आहे त्यांची. आता तर २४ तास पण नाही सलग किती तास ते ही आपल्याला ठाऊक नाही. पोलीस, डॉक्टर, शासकीय यंत्रणेमधली माणसं काय काय करतायत. आपण पाय धरायला पाहिजेत त्यांचे. त्यांना मदत करायला हवी आपण. पण शहाणपणा करुन आपल्याला रस्त्यावर जायचं असतं. अशिक्षित आहोत का आपण? आपल्याला या रोगाचा धोका ठाऊक नाही का? किती संसर्गजन्य रोग आहे हा ठाऊक आहे ना. आजारी माणूस नुसता शिंकला किंवा खोकला तर त्या थुंकूमधून माणूस आजारी पडू शकतो. घराबाहेर जात आहात तुम्ही तर काय आत घेऊन येणार आहात परत? पहिल्यांदा तुमचे जवळचे लोकं बाधित होतील. मग शेजारी, मग संपूर्ण गल्ली, मग राज्य, मग देश, मग संपूर्ण विश्वच बाधित होऊन जाईल. आपल्याला काहीही नाही का याचं? इतके निर्ल्लज आहोत का आपण? बरं मला मरायचं तर मी मरेन ना मी दुसऱ्यांचा जीव का घ्यायचा? तसंही होत नाही इथे. इथे मी माझ्याबरोबर सर्वांनाच वेठीला ठरतोय. किती वैफल्य येत असेल पोलिसांनी की इतकं करुन पण लोकं ऐकत नाही याचा. कधी कळणार आम्हाला हे? गंमत चाललीय सगळीय,” अशा शब्दांमध्ये नानांनी कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांना सुनावले आहे.
व्हिडिओच्या शेवटी नानांनी हा रोग सर्वांना होतो त्यामुळे आपण जबाबदारीने वागायला हवं. घराबाहेर न पडता घरातच बसून सरकारला सहकार्य करायला हवं असं मत व्यक्त केलं आहे. “या सर्वांचा परिणाम अगदी वाईट असेल. स्मशानात जाळायला लाकडं नसतील मग. मुळात अशी व्यक्ती मेल्यावर तिला तुम्हाला भेटताही येत नाही. परस्पर त्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार केले जातायत. कसं जगायचं ते ठरवा म्हणजे असं मरण तुमच्या नशिबी नाही येणार. आता आपण एकमेकांना संभाळायला हवंय. बरं हा केवळ गरिबांना किंवा अमुक जातीला किंवा धर्माला होतो. असं नाहीय हा सर्वांना होतो. येथे जात नाही, धर्म नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही. किमान या क्षणाला तरी आपण सर्व समान आहोत. नका बाहेर पडू हात जोडून सांगतो. हे शेवटचं हात जोडणं आहे,” असं म्हणत नानांनी घरात बसण्याची कळकळीची विनंती जनतेला केली आहे.About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment