खराब टेस्टिंग किटसवर चीनची भूमिका |
चीनमधून आयात करण्यात आलेले काही रॅपिड टेस्टिंग किटस सदोष आढळल्याने तूर्तास या किटसचा वापर थांबवण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे या सदोष किटससंबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची भारतातील चिनी दूतावासाने दखल घेतली आहे.
“निर्यात करण्यात येणाऱ्या वैद्यकीय उत्पादनांचा दर्जा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. याविषयी भारतातील संबंधित यंत्रणांच्या आम्ही संपर्कात राहू व सर्व आवश्यक सहकार्य करु” असे चिनी दूतावासातील प्रवक्त्या जी रोंग यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
करोन व्हायरसची लागण झाल्याचे जलदगतीने निदान करण्यासाठी हे रॅपिड टेस्टिंग किटस चीनकडून आयात करण्यात आले आहेत. पण या किटसमधून चुकीचे निदान होत असल्याची तक्रार राजस्थान सरकारने केली. त्यानंतर आयसीएमआरने पुढील दोन दिवस या चाचण्या न घेण्याचा सल्ला राज्यांना दिला. जलद चाचणीसंच (किट) निर्दोष असल्याची खात्री करून घेतल्यानंतरच त्यांचा वापर करण्याची सूचना ‘आयसीएमआर’ने केली आहे.
भारतात लक्षणे नसलेले रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळल्याने अधिकाधिक नमुना चाचण्या घेण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यासाठी चीनमधून पाच लाख जलद नमुना चाचणीसंच मागवण्यात आले असूऩ, ते राज्यांना वितरितही करण्यात आले. राजस्थानने घेतलेल्या जलद चाचण्यांमध्ये फक्त ५.४ टक्के चाचण्यांचा निष्कर्ष अचूक होता. किमान ९० टक्के चाचण्यांचे निष्कर्ष अचूक असणे अपेक्षित आहे. राजस्थानने दीडशेहून अधिक करोनाबाधित रुग्णांच्या नमुन्याची जलद चाचणी केली. निर्दोष निष्कर्षांमुळे या चाचण्या न घेण्याचा निर्णय राजस्थानने घेतला. राजस्थानच्या तक्रारीनंतर ‘आयसीएमआर’ने अन्य राज्यांकडूनही माहिती मागवली. त्यात फरक जाणवला.
0 comments:
Post a Comment
Please add comment