MaharashtraCurfew | महाराष्ट्रात संचारबंदी

MaharashtraCurfew
MaharashtraCurfew  | महाराष्ट्रात संचारबंदी
नवी मुंबई 
राज्यात संचारबंदी असतनाही काही महाभाग रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच काही जण मुंबईतून बाहेरही जात आहेत. अशाच मुंबई बाहेर पडणाऱ्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यासाठी वाशी टोलनाक्यावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गाड्या अडवून पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर गाड्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात येत आहे. तसंच विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना नवी पोलिसांनी परत मुंबईत पाठवले आहे. हायवेवर सर्वत्र मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

नागपूर 
संचारबंदीमध्ये बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी सक्तीची कारवाई केली आहे. सीताबर्डी परिसरात विनाकारण फिरणाऱ्या अनेकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. विनंती करुनही लोक ऐकत नसल्याने पोलिसांना आता सक्ती करावी लागत आहे. त्याआधीही नागपूरच्या वरायटी चौक, लक्ष्मीबाई चौक आणि झीरो मोबाईल परिसरात बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी सकाळी उठबस करायची शिक्षा देत लगेच घरी पाठवले.

सिंधुदुर्ग 
तळकोकणात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या सीमा बंद केल्यानंतर, बांदा पत्रादेवी इथे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. सीमा बंद केल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या दोन ते तीन किमीपर्यंतच्या रांगा पाहायला मिळत आहेत.

बेळगाव 
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली. यात मद्य दुकाने मध्यरात्रीपासून १ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र बंदी लागू होण्याआधीच तळीरामांनी वाईन शॉपसमोर रांगा लावल्या होत्या. मद्याच्या वाढत्या मागणीमुळे वाईन शॉपमधील शोकेस रिकामे झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तळीरामांनी मद्याचा स्टॉक राहावा यासाठी बँकेत रांगा लावतात त्याप्रमाणे वाईन शॉपसमोर रांगा लावल्या होत्या.

सांगली 
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे.संचारबंदी असूनही नागरिक घराबाहेर पडल असल्याने सांगली जिल्ह्यात सर्व पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झाल्या असून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोनाबाधित चार जण आढळल्याने इस्लामपूर शहरात रात्रीपासून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड 
पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही वाहनांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. पीएमपीएमएलपासून अगदी सायकलपर्यंत प्रत्येक वाहनाचा यात समावेश करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा पुरावणाऱ्या वाहन आणि व्यक्तींची तपासणी करुन वाहतुकीस परवानगी दिली जाईल. 24 मार्च म्हणजे आज पहाटे 5 ते 31मार्चच्या रात्री 12 पर्यंत ही अंमलबजावणी लागू असेल.
संबंधित बातम्या पाहा 


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment