अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ तात्काळ मिळावा म्हणून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केलेली सूचना महिला व बाल विकास मंत्रालयाने अंमलात आणली आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस व लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे लाभाची रक्कम एकरकमी प्रदान करण्यात येते. रक्कम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव प्रकल्पस्तरावरून ठराविक नमुन्यात जिल्हास्तरावर सादर करण्यात येतात. त्यानंतर हे एकत्रित प्रस्ताव महिला व बालविकास विभागाकडे सादर केले जातात. विभागाकडून सर्वच जिल्हय़ांची माहिती एकत्र करून हे प्रस्ताव आयुर्विमा महामंडळ, पुणे यांच्याकडे सादर होतात. मंडळाकडून प्रस्तावाची छाननी होत ‘नेफ्ट’द्वारे अपेक्षित रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. मात्र या पध्दतीत संबंधित कर्मचाऱ्यांना लाभाची रक्कम मिळण्यासाठी मोठा विलंब होत असल्याने राज्यभरातून तशा तक्रारी आल्या. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनांची बैठक घेतली. प्रस्तावाचे आदानप्रदान करण्यात विलंब होत असल्याने ऑनलाईन पोर्टल विकसित केल्यास हक्काची रक्कम तत्परतेने मिळू शकत असल्याचे डॉ. ओंबासे यांनी स्पष्ट केले. आज मुंबईच्या सहय़ांद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत महिला व बालविकास राज्यमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी याबाबत निर्देश दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या रकमेचे प्रस्ताव ऑनलाईन स्वीकारण्यासाठी नव्या पोर्टलचे अनावरण याच बैठकीत करण्यात आले. ही सुविधा सुचवणारे मुख्याधिकारी डॉ. ओंबासे यांचा यात मोठा वाटा असल्याचे मत खात्याच्या सचिवांनी व्यक्त केल्याची माहिती उपमुख्याधिकारी विपुल जाधव यांनी दिली. या पोर्टलमुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व अन्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment
Please add comment