लसींचा पहिला साठा मुंबईत दाखल

 


भारतात करोना लसीकरणास लवकरच सुरुवात होत असून मंगळवारी सीरम इन्स्टियूटकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसींचा पुरवठा करण्यात आला. पुण्यातून करोना लस देशभरात रवाना झाली. दरम्यान मुंबईकरांसाठी या वर्षातील सर्वात मोठी दिलासादायक बातमी आली असून लसींचा पहिला साठा बुधवारी सकाळी ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. १ लाख ३९ हजार ५०० कुप्या मुंबईत पोहोचल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे.  पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणं शक्य होणार आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहनं सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती. एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लस साठा वाहनाचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.

मुंबईत लस साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आलं आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एक कोटी लस साठवून ठेवण्याची क्षमता आहे. मात्र याचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. दुरुस्तीकामे पूर्ण न झाल्याने आरोग्य विभागाने आता लसींचा साठा परळ येथील आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात करण्याचा निर्णय घेतला. परळ येथील एफ साऊथमधील कार्यालयात १० लाख लसींचा साठा केला जाऊ शकतो. आतापर्यंत एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी को-विन अ‍ॅपवर झालेली आहे.

मुंबईमधील लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. तथापि, शाळांमध्ये आवश्यक ती सर्वच वैद्यकीय यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात गरज भासली तरच पालिका शाळांध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.

प्रशासनाने सुरुवातीला आठ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांची उभारणी करण्याची घोषणा केली होती. या आठ केंद्रांमध्ये प्रतिदिन १२ हजार जणांना करोनाची लस देण्याचे नियोजन होतं. त्यानंतर पालिका रुग्णालयं, सलग्न रुग्णालयं, दवाखाने, जम्बो करोना केंद्र आदी ७५ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रशासनाने निश्चित केले. त्या दृष्टीने आखणी सुरू केली असून या केंद्रांमध्ये प्रतिदिन ५० हजार नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे. मुंबईतील लोकसंख्येने दीड कोटीचा आकडा पार केला आहे. उपलब्ध होणारी लस कमी काळात अधिकाधिक व्यक्तींना देण्याचा मानस आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

1 comments:

Please add comment