पुढील २-३ वर्ष दिवसाला १० तास, Six Days Week काम करावं लागेल: नारायण मुर्ती

पुढील २-३ वर्ष दिवसाला १० तास, Six Days Week काम करावं लागेल: नारायण मुर्ती
पुढील काही महिने तरी भारतीयांनी कोरना हा इतर विषाणूंप्रमाणे असल्याचं समजून जगण्यास सुरुवात केली पाहिजे असं मत, इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मुर्ती यांनी व्यक्त केलं आहे. इकनॉमिक्स टाइम्सने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये नारायण मुर्ती सहभागी झाले होते. यावेळेस त्यांनी देशातील सध्याची परिस्थिती आणि एकूण करोनानंतरची परिस्थितीबद्दल भाष्य केलं. त्यांनी अगदी लॉकडाउनपासून ते बेरोजगारीपर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं. मात्र त्याचबरोबर त्यांनी करोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामधून सावरण्यासाठी भारतीयांनी पुढील दोन ते तीन वर्षे दिवसाला दहा तास याप्रमाणे आठवड्यातून सहा दिवस काम करण्याची शपथ घेतली पाहिजे, असंही मत व्यक्त केलं आहे. मुर्ती यांच्या या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांमध्ये नव्या चर्चेचा सुरुवात झाली आहे.
करोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जो फटका बसाल आहे त्यामधून सावरण्यासाठी भारतीयांनी आता आधिक काळ आणि अधिक कष्टाने काम करण्याची गरज असल्याचे मत मुर्ती यांनी मांडले. “आपण सर्वांनी दिवसाचे दहा तास याप्रमाणे आठवड्यातून सहा दिवस काम करण्याची शपथ घेतली पाहिजे. पुढील दोन ते तीन वर्ष या पद्धतीने काम केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला आपण पुन्हा फास्ट ट्रॅकवर आणू शकतो,” असं मुर्ती यांनी म्हटलं आहे. “१९९१ ला अर्थव्यवस्था खुली करण्यात आली त्याप्रमाणे आताही सरकारनेही उद्योगांमध्ये अडथळा आणणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी एका तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली पाहिजे,” अशी इच्छाही मुर्ती यांनी बोलून दाखवली. आपण या गोष्टी केल्या तर आपण अधिक सक्षमपणे या अडचणीमधून बाहेर येऊ असा विश्वासही मुर्ती यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मात्र मुर्ती यांच्या या व्यक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घेऊयात नेटकऱ्यांचे म्हणणे काय आहे…
याच कार्यक्रमात बोलताना  “लॉकडाउन पुढेही सुरू राहिल्यास करोनामुळे नाही तर उपासमारीमुळे भारतात जास्त मृत्यू होतील,” अशी भीतीही मुर्ती यांनी व्यक्त केली. “एका मर्यादेनंतर करोना व्हायरसपेक्षा उपासमारीमुळे होणारे मृत्यू हे अधिक असतील. त्यामुळे भारत लॉकडाउनचा कालावधी अधिक काळ सुरू ठेवू शकत नाही हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे,” असं मुर्ती म्हणाले. बुधवारी व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. ‘इकॉनॉमिक टाईम्स’नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “करोनाच्या एकूण रुग्णसंख्येकडे पाहिल तर भारतातील मृत्यूदर हा ०.२५ ते ०.५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. इतर विकसनशील देशांच्या तुलनेत हा मृत्यूदर कमी फार कमी आहे,” असं निरिक्षणही त्यांनी नोंदवलं.
“भारतात निरनिराळ्या कारणांमुळे दरवर्षी ९ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारत हा जगातिल सर्वात प्रदुषण असेलेल्या देशांपैकी एक आहे. दरवर्षी होणाऱ्या मृत्यूपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे प्रदुषणामुळे होत असतात. गेल्या दोन महिन्यात १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे आणि जर दरवर्षी ९ दशलक्ष लोकांचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या होत असेल तर ही घाबरण्यासारखी स्थिती आहे असं म्हणता येणार नाही”, असंही मुर्ती यांनी सांगितलं. “जेव्हा आपण ९ दशलक्ष लोकांता नैसर्गिकरित्या मृत्यू होत असल्याचे पाहतो आणि जेव्हा आपण मागील दोन महिन्यांत १००० लोकांच्या झालेल्या मृत्यूशी त्याची तुलना करतो तेव्हा ती परिस्थिती आपल्याला वाटते तितकी भीतीदायक नसल्याचं दिसतं. भारतात तब्बल १९० दशलक्ष लोक असंघटीत क्षेत्रात काम करत आहेत किंवा त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. लॉकडाउनमुळे यापैकी काहींनी आपलं काम गमावलं आहे. यापुढेही लॉकडाउन मोठ्या कालावधीसाठी सुरू राहिला तर आणखी लोकांना आपलं काम गमवावं लागेल,” अशी भीती मुर्ती यांनी व्यक्त केली.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment