![]() |
मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर रांगा |
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी पूर्ण झाला असला तरी केंद्र सरकारनं पुन्हा दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. परंतु लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात कॅन्टोनमेंट झोन सोडून रेड, ग्रीन आणि ऑरेंज या तिन्ही झोनमध्ये सशर्त सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच तिन्ही झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगीही देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजपासून (सोमवार) मद्यविक्री सुरू करण्यात आली. दीड महिने मद्यापासून वंचित असलेल्या मद्यप्रेमींनी सकाळपासूनच मद्यविक्रीच्या दुकानांसमोर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
राज्यासह देशभरात कंन्टेन्मेंट झोन वगळता सर्वच ठिकाणी मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे दुकानं उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकांनांबाहेर गर्दी केली होती. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी दुकानदारांनी ठराविक अंतरावर गोल रिंगण आखल्याचं पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी वाढती गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याचं पाहून काही पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला.
मुंबईत अनेक ठिकाणी रांगा
मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर आज मुंबईत अनेक ठिकाणी मद्यप्रेमींनी मद्य विकत घेण्यासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी दुकानं उघडण्यापूर्वी लोकं दुकानांसमोर रांगा लावून उभे राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी ही गर्दी हटवण्यासाठी पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला होता. अनेक ठिकाणी कोणते कॅन्टोन्मेंट झोन आहेत आणि कोणत्या ठिकाणी किती वाजता मद्यविक्री सुरू होणार यावरूनही लोकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत होता.
सोलापूर, पिंपरीमध्ये लोकांची निराशा
सोलापुरात मद्यविक्रीची दुकाने उघडतील म्हणून सकाळपासून मद्यप्रेमींनी दुकानांसमोर गर्दी केली होती. परंतु प्रशासनाने टाळेबंदी तथा संचारबंदीमध्ये नव्याने कोणतीही सवलत न देता ‘परिस्थिती जैसे थे’च ठेवल्यामुळे या मंडळींची मोठी निराशा झाली. त्यामुळे मद्यविक्रीची दुकानं उघडलीच नाहीत. सोलापुरात अशोक चौकाजवळील दारू दुकान सुरू होण्यापूर्वीच तेथे आलेल्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली. नंतर दुकानं न उघडल्यानं सर्वांनाच निराश व्हावे लागले. पिंपरी-चिंचवड शहरातही अनेक ठिकाणी मद्यविक्रीची दुकानं उघडली नव्हती. अनेक ठिकाणी मद्यप्रेमींनी सकाळी सात वाजल्यापासून लावली होती. परंतु, वाईन शॉप न उघडल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे.
पुण्यात पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यातील भांडारकर रोडवरील मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर सकाळपासून तळीरामाची लांबच लांब रांगा लावल्या होत्या. अखेर पोलीस घटनास्थळी आल्यावर तळीरामना घरी जाणे भाग पडलं. कोल्हापूरमध्ये मद्य विक्रीसाठी परवानगी देण्यात आली नाही. मात्र मद्यप्रेमी दुकांनासमोर उघडण्याची प्रतीक्षा करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यातही मद्य विक्रीच्या दुकानांना विरोध होत असल्याचं पाहायला मिलालं. तसंच शहरातील अनेकांनी मद्य विक्री न करण्यासाठई जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं.
दिल्लीतही गर्दी
दिल्लीतही मद्यविक्रीची दुकानं उघडण्यात आली आहे. दिल्लीतील सर्वच जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. असं असतानाही त्या ठिकाणी मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. दुकानांच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंगचं पावन करण्यासाठी लोकांना लांब उभं राहण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच अनेक दुकानांच्या बाहेर लाईनही आखण्यात आल्या आहेत.
नियमांचं पालन व्हावं म्हणून पोलीस
तब्बल दीड महिन्यानंतर मद्यविक्रीची दुकानं उघडल्यानं दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउनच्या नियमांचं पालन व्हावं यासाठी कर्नाटकमध्ये दुकानांसमोर पोलीस उभे असल्याचं पहायला मिळालं. तर दुसरीकडे हुबळीमध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच दुकानांसमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या.
रायपुरमध्ये नियमांचं पालन
अन्य ठिकाणांप्रमाणेच छत्तीसगढमधील रायपुरमध्येही मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली. याठिकाणीही सकाळपासूनच लोकांनी भल्यामोठ्या रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. परंतु मद्यविक्रीच्या दुकानांवर येणाऱ्या अनेकांनी सरकारच्या नियमांचं पालन केल्याचं पाहायला मिळालं. छत्तीसगढमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment