आज पेट्रोल-डिझेलची दरवाढ

मु्ंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅसची दरवाढ केल्यानंतर आज गुरुवारी ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा दणका दिला आहे. आज दिल्लीत पेट्रोल ११ पैसे तर डिझेल प्रति लीटर १४ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८ पैसे आणि डिझेलच्या किमतीत प्रति लीटर १२ पैसे वाढ झाली. यामुळे मुंबईत पेट्रोल ८०.८७ रुपये आणि डिझेल ७१.४३ रुपये झाला आहे. कंपन्यांनी बुधवारी स्वयंपाकाच्या गॅस सिलींडरचा दर १९ रुपयांनी वाढवला होता. 

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोल ८०.८७ आणि डिझेल प्रति लीटर ७१. ४३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ७५.२५ रुपये आणि डिझेलचा दर प्रति लीटर ६८.१० रुपये आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलसाठी ७७.८७ रुपये आणि डिझेलसाठी ७०.४९ रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.
त्याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ७८. २० आणि डिझेल ७१. ९८ रुपये आहे. या दरवाढीने बाजारात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

कशामुळे होते दरवाढ

- पेट्रोलियम कंपन्यांनी २०१७ पासून देशांतर्गत इंधन दर जागतिक बाजाराशी सुसंगत केले आहेत. यात कंपन्यांकडून दररोज इंधन दराचा आढावा घेतला जातो.


- जागतिक कमोडिटी बाजारात खनिज तेलाचा दर जितका तर असेल त्यात आयात खर्च आणि नफा धरून कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचा दर निश्चित केला जातो. 

- मागील दीड वर्षाहून अधिक काळापासून अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये व्यापारी संघर्ष चिघळला आहे. त्याचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. दोन्ही देशांच्या कठोर भूमिकेमुळे खनिज तेल (क्रूड ऑइल) सोने, धातू यासारख्या उत्पादनांच्या किंमतीवर परिणाम होत आहे.

- ताज्या आकडेवारीनुसार कमोडिटी बाजारात क्रूड ऑइल बुधवारी (खनिज तेल) ६६.२१ डाॅलर प्रति बॅरलपर्यंत वाढले आहे. त्यामुळे भारताच्या तेल आयात खर्चात वाढ झाली आहे.

- अमेरिका-चीन व्यापारी युद्धाच्या पार्श्वभूमीवर २०१९ प्रमाणेच २०२० मध्येसुद्धा जागतिक बाजारात खनिज तेलाचे भाव चढेच राहतील, असा अंदाज विशेषकांनी व्यक्त केला आहे.

- आयातीच्या खर्च वाढवण्यात रुपयाचे अवमूल्यन देखील कारणीभूत आहे. आज सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयात ११ पैशांचे अवमूल्यन झाले. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी झाल्याने कंपन्यांचा खनिज तेल आयातीचा खर्च वाढणार आहे.

- परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलची भाववाढ केली आहे. इंधन दरवाढीने पुन्हा एकदा डोकंवर काढल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे.

- मात्र ज्यावेळी रुपयासमोर डॉलरचे मूल्य घसरते आणि खनिज तेलाचे भाव कमी होतात तेव्हा कंपन्या इंधन दरात कपात करतात. 

 

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment