14 हजार निर्वासितांचे प्राण वाचविणारं ‘चमत्कारी जहाज’

ही कहाणी आहे 70 वर्षांपूर्वी घडलेल्या एका अभूतपूर्व, थरारक आणि चमत्कारी सागरी प्रवासाची. अमेरिकेच्या एका मालवाहू जहाजाने तब्बल 14,000 निर्वासितांची उत्तर कोरियामधील बंदरातून सुखरूप सुटका केली होती.
हा काळ कोरियन युद्धाचा होता. चिनी सैन्यानं कोरियावर जोरदार चढाई केली होती. त्यांचा सामना करायला संयुक्त राष्ट्राने आपल्या तुकड्या पाठवल्या होत्या.
या तुकड्यांना माघारी बोलवण्यासाठीची योजना अमेरिकेने आखली. त्यांना घेण्यासाठी अमेरिकीची जहाजं उत्तर कोरियातील्या हंगनम बंदरात पोहोचली तेव्हा तिथे वेगळंच चित्र होतं.

संयुक्त राष्ट्रांच्या सैन्य तुकड्याच नाही तर उत्तर कोरियाचे नागरिकही जीव मुठीत घेऊन पळत होते. या नागरिकांना एस. एस. मेरेडिथ व्हिक्ट्री या अमेरिकन जहाजातून दक्षिण कोरियात नेण्याचा निर्णय झाला आणि सुरू झाला एक थरारक प्रवास.
या जहाजावर दक्षिण कोरियाचे विद्यमान अध्यक्ष मून जे-इन यांचे आई-वडीलही होते. मुंगीही शिरायला जागा नसलेल्या या जहाजाने 14000 नागरिकांचे प्राण तर वाचवलेच. पण तीन दिवसांच्या या प्रवासात जहाजावर चक्क पाच बाळांचा जन्म झाला.
या जहाजाला पुढे The Ship of Miracles हे नाव पडलं. अमेरिकेच्या युद्ध इतिहासातील हे सर्वात मोठं स्थलांतर होतं.
69 वर्षांचे ली यॉन्ग-पिल सांगत होते, "सुईणीने स्वतःच्या दाताने माझी गर्भनाळ कापली. लोकं म्हणतात, की मी जन्माला येणं हा चमत्कारच होता."

स्थलांतर

1950 चा डिसेंबर महिना होता. संयुक्त राष्ट्रांच्या जवळपास एक लाख तुकड्या हंगनम या उत्तर कोरियाच्या बंदरात अडकल्या होत्या. चीनच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यात शेकडोंच्या संख्येने लोक ठार होत होते
ही लढाई 'कोसीनची लढाई' (Battle of Chosin) म्हणून ओळखली जाते. यातले हजारो लोक अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले आणि त्यांची सुखरूप सुटका झाली.
समोर त्यांच्या चौपट चिनी सैन्य होतं. आता सुटकेचा एकच मार्ग उरला होता...समोर पसरलेला समुद्र. मात्र, चीनचं सैन्य जवळ येत होतं. त्यामुळे जे काही करायचं ते लवकर करायचं होतं.
संयुक्त राष्ट्रांच्या तुकड्यांसोबतच उत्तर कोरियातील निर्वासितही हजारोंच्या संख्येने हिवाळ्यात गोठवून टाकणाऱ्या त्या थंड समुद्रकिनारी पोचले होते. युद्धभूमीतून सुखरूप सुटका व्हावी, या आशेने उत्तर कोरियातील हजारो नागरिक आपल्या लहान-लहान मुलाबाळांसोबत अनेक मैल बर्फ तुडवत तिथे पोचले होते.
संयुक्त राष्ट्रांच्या तुकड्यांना घेऊन जाण्यासाठी हंगनमच्या बंदरात अमेरिकेची जवळपास 100 जहाजं आली होती. या तुकड्या, त्यांचं सामान आणि शस्त्रसाठा हंगनमच्या बंदरातून दक्षिण कोरियातील बुसान आणि जिओजे बेटावर सुखरूप पोचवण्याची जबाबदारी या जहाजांना पार पाडायची होती. या ताफ्यातलंच एक जहाज होतं एस. एस. मरेडिथ व्हिक्ट्री.
निर्वासितांची सुटका करणं, हा या योजनेचा भाग नव्हताच. यूएस मरीन कॉर्पचे कर्नल एडवर्ड फॉर्ने यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांचे नातू नेड सध्या सेऊलमध्ये राहतात.
नौदलातून निवृत्त झालेले नेड म्हणतात, "तुम्हाला युद्ध जिंकायचं असेल तर नागरिकांना वाचवणं तुमचं काम नाही. त्यांना वाचवणं चांगलं आहे. मात्र, प्राधान्य सैन्याला असतं."
हंगनम बंदरात उभ्या असणाऱ्या त्या लोकांसाठी अमेरिकन सैन्य म्हणजे देवदूतच होते. नेड पुढे सांगतात, "हे घडून गेलं. निर्वासितांनी त्यांच्यासाठी देवदूत असणाऱ्यांचं ऐकलं आणि मला असं म्हणावसं वाटतं, की कठीण प्रसंगी त्या लोकांनी योग्य त्या कारणांसाठी योग्य ते केलं."
सर्वांना जहाजात बसवण्यासाठी अनेक दिवस गेले. किनारपट्टीवर एकच गर्दी उसळली होती. सर्वजण कधी एकदा आपल्याला जहाजात बसवतात, याची वाट बघत होते.
यातच एक होत्या तेव्हा 17 वर्षांच्या असलेल्या हॅन बो बे. हॅन यांच्यासोबत त्यांची आईही होती.
हॅन सांगत होत्या, "तो जगण्या-मरण्याचा प्रश्न होता. आम्हाला काहीही करून जहाजावर चढायचं होतं. नाहीतर मृत्यू आमच्या समोर उभा होता."
"ते जहाज कुठे जाणार होतं, आम्हाला काहीही कल्पना नव्हती. पण, ते आमच्यासाठी महत्त्वाचंही नव्हतं. आम्हाला फक्त एवढं कळत होतं, की जहाजावर चढलो तरच आमचे प्राण वाचणार होते."
पण, मातृभूमी सोडून जाणं सोपंही नव्हतं.
जहाज निघाल्यावर दूर जाणारा किनारा बघून मला खूप वाईट वाटत होतं. मला वाटलं, की आता मी कधीच परत येणार नाही."
जहाजावरची परिस्थितीही खूप अवघड होती. जहाजावरच्या गाड्या, सामान आणि दारुगोळ्यांच्या पेट्या या मधल्या जागेत निर्वासित अक्षरशः कोंबले गेले होते.
तिथे खायला अन्न नव्हतं. प्यायला पाणीही नव्हतं. तिथे सर्वात मोठं जहाज असलेल्या एस. एस. मेरिडिथ व्हिक्ट्री जहाजाची क्षमता जास्तीत जास्त 60 लोकांना घेऊन जाण्याची होती. मात्र, तिथे होते तब्बल 14 हजार निर्वासित आणि सोबतीला तेवढंच मोठं सामान.
हॅन बो बे डेकवर चढल्या. त्यांच्या आईला सोबत एक अंथरूण तेवढं घेता आलं.
"माझी आई, धाकटी बहीण आणि मी आम्ही तिघीही दाटीवाटीने उभे होतो. जहाजावर खूप माणसं होती."
मात्र, जहाजावरचं कुणीही दगावलं नाही. तब्बल 2 लाख लोक तो अत्यंत धोकादायक समुद्रप्रवास करून सुखरूप दक्षिण कोरियाला पोचले होते. यात निम्मे उत्तर कोरियातले निर्वासित होते, तर निम्मे संयुक्त राष्ट्रांच्या तुकड्यांमधले होते.
अमेरिकेच्या युद्ध इतिहासातील समुद्रमार्गे करण्यात आलेलं हे सर्वात मोठं नागरी स्थलांतर होतं.
हे जहाज जेव्हा जिओजे बंदरावर पोचलं तेव्हा या जहाजावर पाच नव्या पाहुण्यांनी जन्म घेतला होता.
जहाजावर असलेल्या अमेरिकी चालक दलाच्या लोकांना कोरियन नावं माहिती नव्हती. त्यामुळे ते पाचही बाळांना 'किमची' म्हणायचे. ली हे किमची- क्रमांक 5 होते.
ते सांगतात, "मला सुरुवातीला खरंतर ते आवडलं नव्हतं. किमची 5? मला माझं स्वतःचं नाव आहे. मात्र, मी जेव्हा खोलात जाऊन विचार करतो, तेव्हा मला त्याचं काही वाटत नाही आणि आता मला हे नाव देणाऱ्या व्यक्तीचे मी आभार मानतो."
ली आज 70 वर्षांनंतरही त्याच जिओजे बेटावर राहतात जिथे त्या एस. एस. मेरेडिथ व्हिक्ट्री जहाजाने सर्व निर्वासितांना सोडलं होतं. ते पशुवैद्यक आहेत आणि आजही त्यांच्याकडे किमची 5 नावाने बिझनेस कार्ड आहे.
ली यांच्यामुळे हंगनम स्थलांतराच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. मेरेडिथ व्हिक्ट्री जहाजावरच्या चालक दलाच्या काही सदस्यांना ते भेटले आहेत. त्यांच्या आईला प्रसुतीदरम्यान मदत करणाऱ्यालाही ते भेटले आहेत.
बहुतांश निर्वासितांना वाटलं होतं की, काही दिवसांचा प्रश्न आहे. काही दिवसांनी आपण आपल्या मायभूमीत परत येऊ. मात्र, तसं घडलं नाही.
किमची 1 म्हणजेच शॉन यांग-यंगच्या आई-वडिलांना त्यावेळी आणखी दोन मुलं होती. 9 वर्षांचा ताईयंग आणि 5 वर्षांचा याँगक. तिथे हाडं गारठून टाकणारी थंडी पडली होती. बंदरावर एकच गोंधळ उडाला होता.
शॉन यांच्या वडिलांनी आपल्या गर्भार बायकोकडे बघितलं. काहीही करून तिने जहाजावर जाणं गरजेचं होतं. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना काकाकडे ठेवलं आणि आपण लवकरच उत्तर कोरियात परत येऊ असं वचन दिलं.
मात्र, ते पुन्हा कधीच एकमेकांना भेटू शकले नाही. युद्ध संपलं, तात्पुरती शस्त्रसंधी करण्यात आली. कोरियन द्विपकल्प दोन देशात विभागला गेला. मात्र, उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात आजही अधिकृतरित्या युद्ध सुरू आहे.
अनेक वर्ष शॉन यांची आई आपल्या पतीला पुन्हा उत्तर कोरियात जाऊन आपल्या मुलांना परत घेऊन येण्याची विनवणी करत होत्या. मात्र, त्यांना स्वतःलाही हे ठाऊक होतं की, हे अशक्य आहे.
शॉन सांगतात, "माझ्या कुटुंबाची ताटातूट झाली. मला आता स्वतःची मुलं, नातवंडं आहेत. आजही मी जेव्हा कामावरून घरी परत येतो तेव्हा माझी मुलंबााळं सुखरूप आहेत की नाही, याची खात्री करतो."
"मला अजूनही कळत नाही की एकाच आईच्या पोटी जन्मलेलं एक बाळ आपल्या आई-वडिलांसोबत राहू शकतं आणि इतर नाही, हे कसं होऊ शकतं."
"आपले आई-वडील परत येतील, याची त्यांनी किती वाट बघितली असेल."
उत्तर कोरिया सरकार युद्धामुळे विभक्त झालेल्या कुटुंबीयांची भेट घडवून आणतं. या भेटीसाठीची परवानगी इंटरनॅशनल रेड क्रॉस संस्थेकडून घ्यावी लागते. शॉन यांनीही या परवानगीसाठी अर्ज केला आहे.
आपल्या भावंडांना पुन्हा भेटता यावं, यासाठी दोन्ही कोरिया पुन्हा एक व्हावेत, अशी शॉन यांची अपेक्षा आहे.
"ते जिवंत असतील तर मी त्यांना नक्कीच शोधून काढेन," सांगताना शॉन यांना अश्रू अनावर झाले होते.
शॉन यांनी ते बाळ असतानाचा एक फोटो दाखवला. यात त्यांच्या हातात एक पत्र आहे. हे पत्र त्यांच्या वडिलांनी लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात, "तायँग या तुझ्या थोरल्या भावाची भेट होईपर्यंत तू हा फोटो सांभाळून ठेव."
उत्तर कोरियातून त्यावेळी स्थलांतरित झालेल्या त्या हजारो लोकांची पुढची पिढी आज दक्षिण कोरिया आणि जगभरात पसरली आहे. ही एका यशस्वी मोहिमेची कहाणी असली तरी तिला दुःखाची किनारही आहे.
नाताळाच्या त्या संध्याकाळी हंगनम बंदरातून बाहेर पडताना रिअर अॅडमिरल जेम्स डॉयले आपल्या दुर्बिणीतून बघत होते.
या स्थलांतरावर पुस्तक लिहिणारे नेड सांगतात, "बंदरापासून दूर जाणाऱ्या त्या जहाजावर असलेल्या रिअर अॅडमिरल जेम्स डॉयले यांना किनाऱ्यावर तेवढीच गर्दी दिसली जेवढी त्या जहाजावर होती."जहाजImage copyrightUS NAVAL HISTORICAL CENTER

मात्र, चिनी सैन्याने बंदरावर उरलेला शस्त्रसाठा बळकावू नये, यासाठी अमेरिकी सैन्याला बंदराला उडवून देण्याशिवाय पर्याय नव्हता.
जहाजाच्या डेकवर असणाऱ्या हॅन बो बे बंदरातून निघणाऱ्या त्या आगीच्या ज्वाळा बघत होत्या. त्यांनी त्या ज्वाळांचं वर्णन 'Sea of Fire' (आगीचा समुद्र) असं केलं आहे.
स्फोटानंतर काही वेळातच चिनी सैन्याने त्या शहराचा ताबा घेतला.
हॅन सांगतात, "अनेकजण बंदरावर वाट बघत थांबले होते. अनेकांना जहाजावर चढता आलं नव्हतं."
"ते सर्व त्या आगीत भस्मसात झाले असतील. त्या आठवणींनी मला आजही वेदना होतात. युद्ध कधीही घडू नये, कधीच नाही."
आपली दोन्ही मोठी भावंडं जिवंत असतील, अशी आशा शॉन यांना आहे. ते स्वतः त्या जहाजावरूनच आले होते ज्याला 'चमत्कारी जहाज' म्हटलं आहे. त्यामुळे आता त्यांची एकच इच्छा आहे - असाच आणखी एक चमत्कार घडावा आणि आपला हा संदेश आपल्या भावंडांपर्यंत पोचावा.
"आपले आई-वडील जिवंत असेपर्यंत रोज त्यांना तुमची आठवण यायची. आज ते स्वर्गात असले तरी मला खात्री आहे की ते तिथूनही तुम्हालाच शोधत असतील."
"आपलं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, अशी मला आशा आहे. पूर्ण आशा आहे."
जिओजे बंदरात जहाजांचं एक स्मारक उभारण्याचा त्यांचा विचार आहे.

ताटातूट

किमची 2, 3 आणि 4 यांचं पुढे काय झालं, याची मात्र कुणालाच माहिती नाही.मात्र, जहाजावर जन्मलेल्या किमची 1 या पहिल्या बाळाच्या आईवडिलांनी एका मोठा निर्णय घेतला होता.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment