दोन कोटी रुपयांसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

पुणे: मार्केट यार्डातील व्यापाऱ्याचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी सिनेस्टाइलने अखेर गजांआड केले. खंडणी मिळाल्यानंतर व्यापाऱ्याची सुटका झाली असली तरी, आपल्या चातुर्याने दीड कोटी रुपयांसह आरोपीच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले आहे. मुख्य आरोपीने व्यापाऱ्यावर पाळत ठेवून गुन्ह्याचा कट रचल्याचे समोर आले आहे.
सुजीत किरण गुजर (वय २४), ओंकार श्रीनाथ वाल्हेकर (वय २०) आणि अमित पोपट जगताप (वय २०, रा. उरुळी देवाची, वाल्हेकर वस्ती, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य आरोपी अजय बाळासाहेब साबळे (रा. वडकी नाला, ता. हवेली) याचा अद्याप शोध सुरू आहे. या आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली टोयोटा फॉर्च्युनर, एक कोटी ४७ लाख ५० हजारांची रोख रक्कम, एक दुचाकी असा पावणे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साबळे यानेच कुटुंबातील ओळखाच्या व्यक्तीमार्फत पाळत ठेवून व्यावसायिक कांतीलाल गणात्रा (वय ६५, रा. मार्केट यार्ड) खंडणी देऊ शकतात, याची माहिती काढून अपहरण केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखी काहींचा समावेश असून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पुण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गंगाधाम रस्त्यावरील तळेनगर सोसायटीच्या समोरून तीन अज्ञात व्यक्तींनी गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास गणात्रा यांचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. आरोपींनी गणात्रा यांच्या मुलाला फोन करून दोन कोटींची खंडणी मागितली. त्यानुसार झोन पाचमधील सर्व पोलिस ठाण्यांची पथके, गुन्हे शाखेची पथके रात्रभर आरोपींचा माग काढत होती. पहाटेच्या सुमारास पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना पकडण्यात आले. त्यानंतर अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुटका केल्यानंतर तिसऱ्या आरोपीला पकडण्यात आले. ओळखीतील व्यक्तीच्या मदतीने हा कट रचल्याचे समोर आले आहे, अशी माहिती डॉ. शिसवे यांनी दिली.
...
सहा तासांचा थरार...
गंगाधाम रस्त्यावरून व्यापाऱ्याचे काळ्या रंगाच्या मोटारीतून अपहरण करण्यात आले. हा प्रकार पाहिलेल्या एका व्यक्तीने त्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे बीट मार्शलनी घटनास्थळी पोहोचून अपहृताची माहिती काढली. व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याचे समजताच गुन्हे शाखा, झोन पाचमधील पोलिस ठाणी, वाहतूक विभाग कामाला लागले. त्यानंतर आरोपीने व्यापाऱ्याच्या फोनवरून त्यांच्या मुलास फोन करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास आणि अपहरणाची माहिती पोलिसांना दिल्यास गणात्रा यांना मारण्याची धमकी दिली. पोलिसांनीही बराच वेळ आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा माग लागत नव्हता. त्यामुळे गणात्रा यांच्या कुटुंबीयांनी खंडणीची रक्कम देऊन सुटका करण्याची तयारी दर्शवली. कुटुंबीयांनी दीड कोटी रुपयांची तजवीज केली. त्यानंतर आरोपींनी गणात्रा कुटुंबीयांना दीड कोटी रुपये घेऊन चांदणी चौकात बोलविले. त्यानुसार पहाटे चांदणी चौकात सापळा रचण्यात आला. गणात्रा यांचा मुलगा पैसे घेऊन चौकात गेला. पैसे घेण्यासाठी दोघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी पैसे घेऊन फॉर्च्युनरमध्ये टाकले आणि पळ काढला. फॉर्च्युनर पैसे घेऊन गेल्यानंतर दुचाकीवरील दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्या वेळी ट्रिपल केसरी आणि सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांनी झडप घालून एकाला पकडले. दुसरा त्याच ठिकाणी लपून बसला. कसून शोध घेतला असता, तो सापडला. तोपर्यंत आरोपींकडे खंडणीची रक्कम पोहोचली होती. ती रक्कम मिळताच खंडणीखोरांनी कांतीलाल गणात्रा यांना सोडले. गणात्रा यांची सुटका झाल्याचे समजताच पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली आणि उर्वरित आरोपींची माहिती काढली. उरळी देवाची परिसरात आरोपींचा शोध घेत असताना गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर आणि मुख्य आरोपी आढळून आले. तसेच, खंडणीपोटी स्वीकारलेल्या दीड कोटी रुपयांपैकी एक कोटी ४७ लाख ५० हजार रुपये गाडीत आढळले. सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
...
रात्रभर शहर पिंजून काढले
व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याचे समजताच गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक, युनिट पाच, मार्केट यार्ड पोलिस आणि झोन पाचमधील तपास पथकांचे कर्मचारी विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेत होते. आरोपी व्यापाऱ्याच्या फोनवरूनच खंडणीसाठी गणात्रा कुटुंबीयांशी संपर्क साधत होते आणि मोटारीतून फिरत होते. त्यामुळे सर्व पथके रात्रभर विविध भागात फिरून आरोपींचा माग काढत होती. तपासावर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून मार्गदर्शन करत होते. पहाटे आरोपींना पकडल्यानंतर आणि व्यापाऱ्याची सुटका झाल्यानंतर पोलिसांच्या जीवात जीव आला.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment