'त्या' आमदारांनी सांगितला सुटकेचा थरार...........

राष्ट्रवादी काँग्रेसचे 'बेपत्ता' असलेले तीन आमदार परतले आहेत. या आमदारांना हरयाणातील एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवले होते, असा दावा राष्ट्रवादीनं केला आहे. मुंबईत परतलेले आमदार नरहरी झिरवळ आणि आमदार दौलत दरोडा यांनी या सुटकेचा थरार माध्यमांना सांगितला.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत होतं. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर राष्ट्रवादीचे चार आमदार हे शनिवारपासूनच 'नॉट रिचेबल' होते. त्यातील तीन आमदार परतले आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. दौलत दरोडा, अनिल पाटील आणि नरहरी झिरवळ हे तीन आमदार काल रात्री मुंबईत परतले आहेत. हे तिन्ही आमदार सध्या मुंबईत एका हॉटेलमध्ये आहेत. सध्या अण्णा बनसोडे या एकमेव आमदाराचा पाठिंबा अजित पवारांना आहे, त्यांचेही मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे, असंही राष्ट्रवादीनं सांगितलं.

हरयाणाच्या एका हॉटेलमध्ये आमदारांना कोंडून ठेवले होते, असा दावा राष्ट्रवादीनं केला आहे. त्यांना परत आणण्याचं श्रेय राष्ट्रवादीनं पक्षाचे युवा कार्यकर्ते धीरज शर्मा आणि सोनिया दुहण यांना दिलं आहे. 'गुरुग्रामच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये या आमदारांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. त्यांना कुणाशीही बोलू दिलं जात नव्हतं. भाजपचे नेते त्यांच्यावर नजर ठेवून होते. या तिन्ही आमदारांवर भाजपच्या जवळपास दीडशे कार्यकर्त्यांनी पहारा ठेवला होता,' असं सोनिया दुहण यांनी सांगितलं. दुसरीकडे या आमदारांनीही सुटकेचा थरार सांगितला. 'अजित पवार यांनी आम्हाला फोन केला. पक्षाचा नेता आणि गटनेता असल्यानं आम्ही कर्तव्य समजून सकाळी गेलो. तेथून आम्हाला थेट दिल्लीला नेण्यात आलं. उर्वरित आमदारही संध्याकाळपर्यंत येतील असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. हळूहळू आमच्या परिस्थिती लक्षात आली. अखेर आम्ही कसंतरी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला धीर दिला. तेथील पक्षाचे कार्यकर्ते तुमची मदत करतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर ते कार्यकर्ते हॉटेलमध्ये पोहोचले. काही मिनिटांतच त्यांनी आम्हाला बाहेर काढले आणि दिल्लीत आणले. त्यानंतर दिल्लीतून आम्ही मुंबईत आलो. आमचे नेते केवळ शरद पवारच आहेत. आमची आमदारकी राहो अथवा न राहो आम्हाला त्याची पर्वा नाही. पक्षनिष्ठा आमच्यासाठी महत्वाची आहे, ' असं आमदारांनी सांगितलं.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment