भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे.
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपा सरकार स्थापन करु शकला नाही. त्यामुळे आता भाजपाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्तीदेखील जाहीर केली आहे. तसंच सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार असल्याचंही जाहीर केलं आहे.
त्यादृष्टीने आता शिवसेनेनेही तयारीला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेकडून ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेकडून गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
१० जानेवारीला जोगेश्वरीत हा मेळावा पार पडणार आहे. यासाठी मराठी आणि गुजराती भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. या मेळाव्यात शिवसेनेत जाहीर प्रवेशदेखील पार पडतील असं सांगितलं जात आहे.
‘केम छो वरळी’
विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बॅनर लावण्यात आले होते. वरळीत लावण्यात आलेल्या या बॅनरमधून मराठीसोबतच इतर भाषेतील मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये ‘केम छो वरळी‘ असं पोस्टरही लावण्यात आलं होतं. ज्यावरुन अनेकांनी नाराजी जाहीर केली होती.
0 comments:
Post a Comment
Please add comment