अ‍ॅॅॅॅॅमेझॉनला या व्यवहाराबद्दल माहीत होते - फ्युचर समूहाचे संस्थापक किशोर बियाणीफ्युचर समूहातील किराणा व्यवसायाच्या विक्रीसंबंधाने रिलायन्सबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींची अ‍ॅमेझॉनला माहिती होती. तथापि समूहाच्या आर्थिक चणचणीच्या समस्येवर तोडग्यासंबंधाने अमेरिकी कंपनीने कोणतीही ठोस मदत देऊ केली नाही, असे प्रतिपादन फ्युचर समूहाचे संस्थापक किशोर बियाणी यांनी मंगळवारी केले.

रिलायन्सबरोबर झालेल्या २४,७१३ कोटी रुपयांच्या विक्री व्यवहारानंतर, ई-कॉमर्स क्षेत्रातील महाकाय अ‍ॅमेझॉनशी कायदेशीर झगडा सुरू झाल्यानंतर, बियाणींनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खुलासेवार टिप्पणी केली आहे.
अ‍ॅमेझॉनने २०१९ मध्ये फ्युचर कूपन्स या समूहातील कंपनीत केलेली गुंतवणूक केवळ भेटवस्तू व कूपन व्यवसायातील स्वारस्यापोटी केली होती आणि रिलायन्सबरोबर व्यवहार मार्गी लागल्याने त्यात कोणताही अडसर येणार नाही, असेही बियाणी यांनी स्पष्ट केले. रिलायन्ससह झालेला व्यवहार पुढील दोन महिन्यांत बाजार नियामक ‘सेबी’च्या मंजुरीनंतर पूर्णत्वाला जाईल, असा विश्वासही बियाणींनी व्यक्त केला.

अ‍ॅमेझॉनने या व्यवहाराविरोधात आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयात धाव घेतली असून, त्या संबंधाने सुनावणीही जानेवारीच्या उत्तरार्धात सुरू होणार आहे. लवादापुढील सुनावणी आणि रिलायन्सबरोबरच्या व्यवहाराची पूर्तता या दोन्ही गोष्टी समांतर रूपात सुरू राहतील, अशी बियाणी यांनी स्पष्टोक्ती केली.

रिलायन्सशी झालेल्या विक्री व्यवहाराचा आणि अ‍ॅमेझॉनची गुंतवणूक असलेल्या फ्युचर कूपन्सचा यांचा कोणताही परस्परसंबंध नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. करोनाचा फैलाव टाळण्यासाठी सुरू झालेल्या टाळेबंदीचा समूहाच्या किराणा व्यवसायाला आघात सोसावा लागला व कर्जाचे ओझेही वाढत गेले होते, यासमयी फ्युचरकडून अ‍ॅमेझॉनशी अनेकवार संपर्क साधला गेला.

बियाणी म्हणाले, ‘करोना टाळेबंदीला सुरुवात झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही अ‍ॅमेझॉनशी चर्चेचा प्रयत्न चालविला होता. नेमके काय चालले आहे याची त्यांना कल्पना नव्हती असेही नाही. मार्चमध्ये आम्ही त्यांना पत्र लिहून किमतीतील घसरण आणि तारण समभागांची मागणी वाढत असल्याचे कळविले.’ या समभागांवर मालकी कायम राहावी यासाठी या ना त्या तऱ्हेने मदत मिळविण्याचा अ‍ॅमेझॉनकडून प्रयत्न विफल ठरल्याचे बियाणी यांनी मुलाखतीत तपशीलवार सांगितले. कित्येकदा कॉल्स, बैठका अशा वेगवेगळ्या मार्गाने संवाद सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता. पुढे रिलायन्स इंडस्ट्रीजशी बोलणी सुरू केल्याची माहितीही त्यांना देण्यात आली. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनल्यानंतर संवाद पूर्णपणे बंद असल्याचे बियाणी यांनी स्पष्ट केले. मात्र फ्युचर समूहाची आर्थिक अडचणीची जाणीव असतानाही, कोणतीच मदत दिली नाही या बियाणी यांच्या प्रतिपादनाला अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्याने प्रतिवाद केला आहे. उभयतांकडून स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारपत्रांप्रमाणे, वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी आपल्याकडून सुरू होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment