लसीकरण (Corona vaccination) घेण्याआधी किंवा नंतर दारू प्यायलेली चालते का?2020 हे वर्ष सरलं आणि कोरोनावरील (Coronavirus) चर्चेची जागा आता कोरोना लशीवरील (Corona Vaccine) चर्चेने घेतली आहे. भारतासह अनेक देशांत कोरोनाच्या काही लशींना मंजुरी मिळाली असून, लसीकरण कार्यक्रमही सुरू झाले आहेत किंवा होत आहेत. या पार्श्वभूमीवर, लशीची परिणामकारकता कमी न होण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोरोनाप्रतिबंधक लस घेण्याच्या आधी  आणि लस घेतल्यानंतर काही दिवस मद्यपान केल्यास लशीचा (Covid Vaccine) आवश्यक तो परिणाम साध्य होणार नाही आणि कोरोनाला प्रतिकार करण्याची शक्ती शरीरात तयार होणार नाही, असं शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात सिद्ध झालं आहे. 'डेलीमेल'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

मानवाच्या आतड्यात अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. ते रोगकारक जिवाणू आणि विषाणूंना प्रतिकार करत असतात. आतड्यातील या आवश्यक सूक्ष्मजीवांच्या रचनेत अल्कोहोलमुळे बदल होतो. त्यामुळे रक्तातल्या पांढऱ्या पेशी आणि लिम्फोसाइट्सना हानी पोहोचते. पांढऱ्या पेशी रोगप्रतिकारशक्ती देतात, तर लिम्फोसाइट्सद्वारे विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार होतात.

इमर्जन्सी मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. राँक्स इखारिया यांनी याबाबतचा एक प्रयोग केला. 'बीबीसी'वर बुधवारी प्रसारित होणाऱ्या 'दी ट्रूथ अबाउट बूस्टिंग युवर इम्युन सिस्टीम' या डॉक्युमेंटरीच्या त्या सादरकर्त्या आहेत. ब्रिटनमध्ये प्रोसेक्को ब्रँडची व्हाइट वाइन उपलब्ध असते. या वाइनचे तीन ग्लास प्राशन केलेल्यांच्या रक्ताचे नमुने त्यांनी गोळा केले. वाइन घेण्याआधीचे आणि नंतरचे अशा दोन्ही वेळचे नमुने घेऊन त्यांचा अभ्यास करण्यात आला. तीन ग्लास मद्यामुळे रक्तातल्या लिम्फोसाइट पेशी 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात, असं त्यांना या प्रयोगात आढळलं.

रक्तातल्या लिम्फोसाइट्सचं प्रमाण कमी झालं, तर शरीराच्या प्रतिकारयंत्रणेची कार्यक्षमता कमी होऊ शकते, असं मँचेस्टर विद्यापीठातल्या प्रतिकारशक्ती या विषयातल्या तज्ज्ञ प्रा. शीना क्रूकशँक यांनी सांगितलं. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या कालावधीत अल्कोहोल अर्थात मद्यप्राशन करू नये, असं आवाहन प्रा. क्रूकशँक यांनी केलं आहे.

'घेतलेल्या लसीला शरीराने योग्य प्रतिसाद द्यायला हवा असेल, तर तुमच्या शरीराची प्रतिकार यंत्रणा उत्तम पद्धतीने कार्यरत असायला हवी. लस घेण्याच्या आदल्या रात्री किंवा लस घेतल्यानंतरच्या लगेचच्या दिवसात तुम्ही मद्यपान केलं असेल, तर लसीची उपयोगिता कमी होईल,' असं प्रा. क्रूकशँक यांनी म्हटलं आहे.

प्रौढांमध्ये रक्तातल्या पांढऱ्या पेशींत लिम्फोसाइट्सचं प्रमाण 20 ते 40 टक्के असतं. प्लीहा, टॉन्सिल्स, लिम्फ नोड्स असे काही अवयव किंवा ऊतींमध्ये लिम्फोसाइट्स प्रमुख्याने केंद्रित झालेल्या असतात. शरीराच्या प्रतिकारयंत्रणेचा प्रतिसाद तिथून सुरू होतो. प्रतिकारयंत्रणेमध्ये लिम्फोसाइट्स हा मूलभूत घटक असतो. कारण शरीराबाहेरून आत आलेले घातक विषाणू, जिवाणू आदींना नेमका कसा प्रतिसाद द्यायचा, त्यांचा प्रतिकार कसा करायचा, याचा निर्णय लिम्फोसाइट्स पेशी घेतात. चीनमधल्या वुहान इथून कोरोनाचा संसर्ग साऱ्या जगभर झाला. तिथल्या शास्त्रज्ञांचाही अनुभव हेच सांगतो.

त्यामुळे अल्कोहोलयुक्त द्रव्य अर्थात मद्य, वाइन आदींमुळे लिम्फोसाइट्स या महत्त्वाच्या पेशींचं प्रमाणच कमी होणार असेल, तर लस घेऊनही आवश्यक ती प्रतिकारशक्ती शरीरात तयार होणारच नाही. त्यामुळे लस घेऊनही कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. म्हणूनच लसीकरणाच्या काळात मद्यपान करू नये, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. नेमका किती काळ याबाबत शास्त्रज्ञांनी नेमकं सांगितलं नसलं, तरी लसीकरणाच्या काही दिवस आधी आणि काही दिवस नंतर मद्यपान न केलेलंच बरं!

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment