देशातील ३४ आनंदी शहरांच्या यादीमध्ये राज्यातील तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आनंदी शहरांच्या यादीत पुणे शहराने मुंबई आणि नागपूर शहरांना मागे टाकले आहे. देशातील आनंदी शहरांमध्ये पुणे १२ व्या स्थानी असून नागपूर १७ व्या आणि मुंबई २१ व्या स्थानी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आनंदी शहरांमध्ये लुधियाना अव्वल ठरले आहे. अहमदाबाद आणि चंदिगड शहरे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.
‘इंडियन सिटिज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’मध्ये आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रा. राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांतील १३ हजाराहून अधिक नागरिकांशी चर्चा करून ही यादी तयार के ली आहे. गेल्या अनेक दशकांपासून व्यवस्थापनासंदर्भातील संशोधनामध्ये राजेश कार्यरत आहेत. देशातील वेगवेगळ्या शहरांमधील हॅपीनेस इंडेक्स म्हणजे आनंदी राहण्याच्या प्रमाणासंदर्भातील माहिती या माध्यमातून प्रथमच समोर आली आहे. वयोमान, शिक्षण, कमाई आणि शहरात वास्तव्य करताना मिळणाऱ्या सोई-सुविधा तसेच जीवनशैली या निकषांच्या आधारे आनंदी शहरांची यादी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोठय़ा शहरांध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा जास्त आनंदी असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर या यादीमध्ये १२ व्या स्थानी आहे. देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये पुण्याबरोबरच नागपूर आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेले मुंबई शहर या यादीमध्ये २१ व्या स्थानी आहे, तर उपराजधानी नागपूर १७ व्या स्थानी आहे. त्यामुळे आनंदी राहण्यामध्ये पुणेकरांनी नागपूरकर आणि मुंबईकरांनाही मागे टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
लुधियाना, अहमदाबाद, चंदिगड, सुरत, वडोदरा, अमृतसर, चेन्नई, जयपूर, जोधपूर, हैदराबाद, भोपाळ, पुणे, नवी दिल्ली, डेहराडून, फरिदाबाद, पाटणा, नागपूर, इंदूर, कोची, भुवनेश्वर, मुंबई, गुवाहटी, धनबाद, नोएडा, जम्मू, कानपूर, बंगळूरू, कोलकता, लखनऊ, शिमला, रांची, गुरुग्राम, विशाखापट्टणम, रायपूर
0 comments:
Post a Comment
Please add comment