पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, प्रमुख शहरांमध्ये काय आहेत दर ?

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सतत वाढत आहेत. काँग्रेसने वाढत्या इंधन दरावरुन राज्यभरात आंदोलन पुकारलं असताना सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात पाच पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ५३ पैसे झाला आहे. इंधनाचे दर रोज वाढत असताना रविवारी मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता.
मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत पाच पैसे वाढ झाल्याने दर प्रतिलिटर ८७ रुपये १९ पैसे झाला आहेत. तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली असल्याने दर प्रतिलिटर ७८ रुपये ८३ पैसे झाला आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८२ रुपये १० पैसे झाला असून डिझेलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये ६४ पैसे झाला आहे. चेन्नईत सोमवारी पेट्रोलचा दर ८३ रुपये ६३ पैसे झाला असून डिझेल प्रतिलिटर ७७ रुपये ७२ पैशांना मिळत आहे.
दिल्लीला लागून असणाऱ्या नोएडाबद्दल बोलायचं गेल्यास सोमवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८१ रुपये ८ पैसे झाला असून डिझेलचा दर प्रतिलिटर ७२ रुपये ५९ पैसे झाला आहे. तर गुरुग्राम येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७८ रुपये ६४ पैसे असून डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये ७७ पैशांना मिळत आहे. गाजियाबादमध्ये सोमवारी पेट्रोल प्रतिलिटर ८० रुपये ९५ पैशांना मिळत असून डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये ४४ पैशांना मिळत आहे.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने काँग्रेसने निषेध व्यक्त केला असून आज राज्यभरात आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली होती. अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत, या संदर्भात सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं.
बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काँग्रेस २९ तारखेला पेट्रोल आणि डिझेलची जी भाववाढ चालली आहे त्याविरोधात एक तासाचं आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबत केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात येणार आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने अर्थ्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे”.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment