वीज ग्राहक-महावितरण कर्मचाऱ्यांत हाणामारी!

वीज ग्राहक-महावितरण कर्मचाऱ्यांत हाणामारी!
टाळेबंदी काळातील तीन महिन्यांचे वीज देयक अवास्तव आल्याची तक्रार घेऊन महवितरणच्या तुळशीबाग कार्यालयात गेलेल्या  ग्राहकांची येथील सुरक्षा रक्षक व महावितरण कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी झाली. दोन्ही गटांनी  कोतवाली पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.
टाळेबंदीकाळात महावितरणने छापील देयकाचे वितरण थांबवले होते. आता  महावितरणकडून  तीन महिन्यांचे देयक एकत्र दिले जात आहे.  हे देयक अवास्तव असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. आज गुरुवारी महावितरणच्या तुळशीबाग कार्यालयातही ग्राहकांनी गर्दी केली होती. यात महाल येथील मनोज धोपटे हाही होता. येथील लिपिक पूर्वेश ठाकरे याने त्याच्या देयकाबाबत सविस्तर माहिती दिली. परंतु समाधान न झाल्याने तो रागाच्या भरात बाहेर आला. त्याने  इतर ग्राहकांना महावितरणकडून लूट सुरू असल्याचे सांगितले. यावर सुरक्षा रक्षक चंद्रशेखर बनसोडने त्याला रोखले. यावरून मनोज धोपटे, त्याच्यासोबत आलेला तन्मय भोसेकर व सुरक्षारक्षकात हाणामारी झाली. दरम्यान, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव येथे आले. त्यांनी ग्राहकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. दोन्ही गटांकडून कोतवाली पोलीस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यात आली.
ग्राहकाच्या आजोबाची प्रकृती खालावली
उपस्थित ग्राहकांनी मात्र महावितरणचे आरोप फेटाळले. त्यांच्यानुसार, तन्मय भोसकर हे आजोबा माधवराव यांना घेऊन  तक्रार करायला आले होते. माधवराव महावितरणचे निवृत्त कर्मचारी असून त्यांच्या पत्नी मायाताई या भाजपच्या माजी नगरसेविका आहेत. घटनेच्यावेळी येथे तीनशेहून अधिक ग्राहक होते. परंतु कर्मचारी ऐकत नव्हते. परिणामी ग्राहक संतापले. दरम्यान, सुरक्षारक्षकाने ज्येष्ठ नागरिक माधवराव यांना ओढले. त्यातूनच मारहाणीचा प्रकार घडला. त्यानंतर माधवराव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. अनेकांनी घटनेचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment