आमच्या विरोधात काही करण्याची हिंमत केली तर.. पाकिस्तानची भारताला धमकी


भारताविरोधात कुरघओड्या करून अनेकदा तोंडावर पडलेल्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानविरोधात भारतानं काही करण्याची हिंमत केली तर आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ, अशी धमकी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली.
मुल्तानमध्ये ईदच्या नमाज पठणानंतर कुरेशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली. “पाकिस्तानला शांतता प्रस्थापित करायची आहे. आमचा संयम म्हणजे आमचा कमकुवतपणा समजण्याची चूक करू नका,” असं कुरेशी म्हणाले. “भारतानं पाकिस्ताविरोधात काहीही करण्याची हिंमत केली तर त्याचं उत्तर दिलं जाईल. काश्मिरमधील कथितरित्या होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनांबाबत दखल घेण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आणि इस्लामिक सहकार संघटनेकडे संपर्क साधला आहे,” असंही ते म्हणाले.
ओआयसीमध्ये इस्लामिक देशांचं भारताला समर्थन
इस्लामिक देशांची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमध्ये (ओआयसी) पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची पाळी आली. पाकिस्तानने इस्लामोफोबियाच्या आरोपावरून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु या संघटनेच्या सदस्य देशांपैकी अनेकांनी भारताची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं. मालदीव व्यतिरिक्त सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीनं भारताची बाजू घेतल्याचं समोर आलं आहे. भारत इस्लामोफोबियाला खतपाणी घातल असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी आयओसीच्या एका ऑनलाइन बैठकीदरम्यान केला होता. परंतु मालदीवनं याचं खंडन करत भारत हा जगातिल सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे, असं म्हटलं होतं. तसंच भारतात २० कोटीहून अधिक मुस्लिम वास्तव्य करत असून भारतावर असा आरोप करणं अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अशा प्रकारचा आरोप दक्षिण आशियाई क्षेत्रात करणं हे धार्मिक एकतेसाठी घातक असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment