![]() |
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीबाबत अफवा |
बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अचानक अफवा पसरल्या आहेत. नसरूद्दीन शाह हे आजारी असून त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती केल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, हे वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाहने स्पष्टिकरण दिलं आहे. विवानने ट्वीट करत, त्याचे बाबा म्हणजे, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची प्रकृती उत्तम असून ते रूग्णालयात नाही तर आपल्या घरी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे.
सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांबाबत जसं विवानला समजलं त्याने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. विवान शाहने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'सगळं काही ठीक आहे. बाबा एकदम ठीक आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत केल्या जाणाऱ्या सर्व चर्चा चुकीच्या आहेत, अफवा आहेत. ते इरफान आणि चिंटूजींसाठी प्रार्थना करत आहेत. या दोघांची त्यांना खूप आठवण येत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली आहे.'
विवान शाहने ट्वीट करण्याआधी नसीरुद्दीन शाह यांच्या मॅनेजरनेदेखील ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, 'सोशल मीडियावर ज्या काही अफवा अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्याबाबत पसरवण्यात येत आहेत. त्या खोट्या आहेत. ते आपल्या घरी आहेत आणि त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. तसेच ते या अफवांमुळे नाराज आहेत.'
दरम्यान, रात्री उशीरा अचानक अफवा पसरवण्यात आली. ट्विटरवर #naseeruddinshah हा हॅशटॅग नंबर एकवर ट्रेंड करत होता. तसेच सोशल मीडिया युजर्स त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही करू लागले. त्यानंतर त्यांचा मुलगा विवानने ट्वीट करून सर्व अफवा असून त्यांची प्रकृती ठिक असल्याचं स्पष्ट केलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment