![]() |
पुण्यात ‘मे’ अखेरपर्यंत ५,००० करोनाबाधित रुग्ण असतील – महापालिका आयुक्त |
पुणे शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरात आढळणार्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ती मे अखेरपर्यंत ९ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या करोनाबाधित आणि डिस्चार्ज रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत ही रुग्णसंख्या सुमारे ५ हजारांपर्यंत असेल, अशी शक्यता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.
यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, पुणे शहरात काल अखेरपर्यंत ३ हजार ९३ इतकी रुग्णसंख्या होती. यांपैकी १ हजार ६३० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या पुणे शहरातील अनेक रूग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत शहरात ५ हजार रुग्ण असतील अशी शक्यता त्यांनी व्यक्ती केली.
भविष्यात शहरात रुग्णसंख्या जरी वाढत राहिली तरी त्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक राहणार आहे. ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने समाधानाची आहे. दरम्यान, कालपर्यंत जिल्ह्यात १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी आपल्या सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही आयुक्त गायकवाड म्हणाले.
१८ मे पासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भाग अधिक प्रमाणात सुरु होईल
शहरातील मध्य भाग मोठ्या प्रमाणावर करोनाच्या आजारानं संक्रमित झाला आहे. त्यामुळे आता १८ तारखेपर्यंत शासनाच्या निर्णयानुसार त्या भागात कोणत्या सुविधा द्यायच्या ते ठरविले जाणार आहे. मात्र, उर्वरित शहरातील काही भाग अधिक प्रमाणात सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
0 comments:
Post a Comment
Please add comment