अमेरिकेत करोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी


करोना व्हायरसला रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लसीची अमेरिकेत मानवी चाचणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील ही पहिली मानवी चाचणी आहे. या चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत. ज्यांना ही लस टोचण्यात आली, त्यांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत तसेच करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली, असे ही लस विकसित करणाऱ्या मोडर्ना कंपनीने सोमवारी जाहीर केले.
पहिल्या आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मार्चपासून या चाचण्या सुरु झाल्या होत्या. आठ स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले. लस दिल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात तयार झालेल्या अ‍ॅंटीबॉडीची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. मुख्य म्हणजे व्हायरसचा शरीरात होणारा फैलाव रोखण्यामध्ये ही लस अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले. प्रभावी लसीसाठी हीच सर्वात महत्वाची गोष्ट होती.
दुसऱ्या टप्प्यात मोडर्ना ६०० तंदुरुस्त स्वयंसेवकांवर mRNA-1273 लसीची चाचणी करणार आहे. ६०० स्वयंसेवकांपैकी निम्मे १८ ते ५५ वयोगटातील तर उर्वरित ५५ च्या पुढच्या वयोगटातील असतील. mRNA-1273 लसीद्वारे करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यात येईल. जुलै महिन्यात तिसऱ्या टप्प्यात १ हजार लोकांवर चाचणी करण्यात येईल. एफडीएने दुसऱ्या फेजसाठी मोडर्नाला परवानगी दिली आहे.


Covid-19 वर लस संशोधन करणाऱ्या मोडर्ना थेराप्युटीक्सला अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासन FDA कडून जलदगतीने आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकन कंपनी सुद्धा लवकरच लसीच्या मानवी चाचण्या सुरु करणार आहे. सध्याच्या घडीला Covid-19 ची लस सर्वांसाठीच महत्वाची आहे. जगात जवळपास १०० संशोधकांचे गट करोनाला रोखणारी लस शोधून काढण्यासाठी संशोधन करत आहेत. संशोधन ते क्लिनिकल चाचण्या अशा वेगवेगळया टप्प्यांवर हे लस प्रकल्प आहेत.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment