
गेल्या काही दिवसांपासून जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शाब्दिक चकमक सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. यापूर्वीही डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर आरोपही केले होते. तसंच निधी रोखण्याचाही इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी “संघटनेत सुधारणा करा अन्यथा ३० दिवसांत तुमचा निधी कायमचा बंद करू” असा जागतिक आरोग्य संघटनेला दिला आहे. ट्रम्प यांनी पत्राद्वारे हा इशारा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनंनं ३० दिवसांमध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं नाही तर अमेरिका कायमसाठी त्यांचा निधी रोखेल. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांना एक पत्र लिहिलं आहे. संघटनेच्या चुकांची शिक्षा संपूर्ण जग भोगत असल्याचं सांगत त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यपदावरून हटण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
“जगाला बरीच किंमत मोजावी लागणार्या कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी आपली संस्था आणि आपण वारंवार चुकीची पावले उचलली आहेत हे स्पष्ट झालं आहे. चीनपासून आपण स्वतंत्र आहोत हे सिद्ध करणं हा संघटनेला पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. या जागतिक संघटनेत सुधारणा करण्यासाठी माझ्या प्रशासनाने तुमच्याशी चर्चा सुरू केली आहे. परंतु त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. वेळ वाया घालवून चालणार नाही,” असंही ट्रम्प म्हणाले.
“फार कमी वेळात हे संकट सर्वासमोर आलं आहे. करोनामुळे अमेरिकेत ९० हजार तर जगभरात ३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लसीवर सुरू असलेल्या संशोधनाचा निकाल उत्तम मिळाला आहे. परंतु आतापर्यंत या संकटावर कोणतेची ठोस उपचार नाहीत. संयुक्त राष्ट्राचा हा आरोग्य विभाग चीनच्या हातचं बाहुलं बनला आहे,” असा आरोपही त्यांनी केला. “चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर आम्ही निर्बंध घातले नसते तर देशातील आणखी नागरिकांचा मृत्यू झाला असता. याचा आरोग्य संघटनेनं विरोध केला होता. ही संघटना चीन केंद्रीतच आहे,” असंही ट्रम्प म्हणाले.
आरोग्य संघटनेचा होता विरोध
“जागतिक आरोग्य संघटनेनं अतिशय अयोग्य काम केलं आहे. अमेरिका दरवर्षी संघटनेला ४५ कोटी डॉलर्सची मदत करतो. तर चीन केवळ ३.८ कोटी डॉलर्सची मदत करतो. आम्ही चीनमधील नागरिकांच्या अमेरिकेत येण्यावर निर्बंध घातले. परंतु संघटना त्याविरोधात होती. तुम्ही खुप कठोर पावलं उचलत आहात असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु ते चुकीचं असल्याचं सिद्ध झालं,” असंही ट्रम्प म्हणाले.
“डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेदेखील या निर्बंधांच्या विरोधात होते. मी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंधनं घातली होती म्हणूनच त्यावेळी त्यांनी परदेशी नागरिकांचा मी तिरस्कार करतो असं म्हटलं होतं,” असा दावाही त्यांनी केला.
0 comments:
Post a Comment
Please add comment