करोना रुग्णांच्या शेजारी ११ तास पडून होता मृतदेह


घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत करोना रुग्णांच्या शेजारीच मृतदेह पडून असल्याचं दिसत आहे. भाजपा आमदार नितेश राणे आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी हा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे. संजय निरुपम यांनी तत्काळ रुग्णालयाच्या डीनवर कारवाई करत निलंबन करण्याची मागणी केली आहे. याआधी सायन रुग्णालयातील मृतदेहाशेजारीच करोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता.
व्हिडीओमध्ये मृतदेह एका प्लास्टिग बॅगमध्ये ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. यावेळी मृतदेहाच्या शेजारी एक महिला रुग्ण असून इतर रुग्ण असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ मृतदेह ठेवण्यात आलेल्या शेजारील बेडवर असणाऱ्या महिला रुग्णाने शूट केलेला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, करोनामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. महिला शेवटच्या क्षणी पाणी मागत असतानाही तिला कोणी कर्मचारी पाणी देण्यासाठी आला नव्हता असा दावाही तिने व्हिडीओत केला आहे.
व्हिडीओ शूट करताना महिला सांगत आहे की, “गेल्या १० ते १२ तासांपासून हा मृतदेह येथे पडून आहे. या लोकांनी मृतदेहाला प्लास्टिकमध्ये कव्हर करुन ठेवलं आहे. बाजूला इतर रुग्णही आहेत. त्या बाजूला अजून एक मृतदेह पडलेला आहे पण मी तिथे जाणार नाही. यांच्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे. अजूनपर्यंत एकही कर्मचारी आलेला नाही. आम्हाला अन्न, पाणी काहीच जात नाही”.
“हा एका महिलेचा मृतदेह असून तडफडून तिचा मृत्यू झाला आहे. मीच तिला पाणी पाजलं. कोणी पाणी पाजायलाही येत नाही. आमच्याकडे ग्लोव्ह्जही नाहीत. सरकार काम करतंय पण बाहेर दाखवतात तेवढं आतमध्ये होत नाही. मला वाटतं सरकारी रुग्णालयात सीसीटीव्ही लावले पाहिजे. त्यामुळे हे लोक काय करतात हे दिसेल. १५ तास जर रुग्णांमध्ये मृतदेह ठेवला तर कसं होईल. मी येथे बरी होण्यासाठी आली होती. पण आता घरी गेलेलं बरं असं वाटत आहे,” असंही महिला बोलताना ऐकू येत आहे.
राजावाडी रुग्णालयाचं स्पष्टीकरण –

“रुग्ण बरे व्हावेत यासाठी आमही अथक प्रयत्न करत असून दिवस-रात्र काम करत आहोत. करोनाविरोधात आम्ही रोज लढत आहोत. प्रोटोकॉल माहिती असतानाही आणि लोक आजकाल व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर रिपोर्ट करत असल्याची कल्पना असतानाही आम्ही इतके तास मृतदेह असाच का ठेवला असता ? आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, पण लोक काही मोजके मुद्देच मांडतात. नातेवाईक उशिरा येत असल्याने किंवा कोणीच जबाबदारी घेत नसल्याने अनेकदा मृतदेह ४० ते ४५ मिनिटं किंवा एक तास बेडवर पडून असतो. काहीजण आम्हाला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगतात. करोना रुग्णांचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला जाईपर्यंत तो वेगळा ठेवण्याची व्यवस्था आमच्याकडे कऱण्यात आली आहे. पण अशा गोष्टी मांडल्या जातात याचं वाईट वाटतं. मी याप्रकऱणी तपास करत असून नेमकं काय झालं होतं याची माहिती घेत आहे,” असं राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विद्या ठाकूर यांनी सांगितलं आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment