![]() |
'ही' लक्षणे ज्येष्ठांमध्ये आढळल्यास वैद्यकीय तपासणी करुन घ्या! |
कोविड १९ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा कोरोना हा आजार आधीपासूनच आजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त प्राणघातक ठरत आहे. प्रामुख्याने हृदयविकार, रक्तदाबाचा त्रास, मधुमेह असे आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे आवश्यक आहे, असे डॉक्टर सांगत आहेत. भारतात डॉक्टरांनी विशिष्ट लक्षणे आढळल्यास ज्येष्ठ नागरिकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत.
ज्या ज्येष्ठ नागरिकांना लवकर थकल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, वारंवार दम लागणे, भूक न लागणे, तोल जाणे, विसरायला होणे, शरीर थरथरणे (कंप पावणे), ताप येणे, खोकला, घसा दुखणे (घशाला सूज येणे) यापैकी कोणतेही लक्षण अलिकडच्या काळात वारंवार जाणवत असेल त्यांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा; असे डॉक्टरांनी सुचवले आहे. जी लक्षणे जाहीर केली आहेत ती आढळली याचा अर्थ कोरोना झाला असे नाही. काही जणांना वयोमानामुळे किंवा इतर त्रासामुळे ही लक्षणे आढळली असतील. पण कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता तरुणाईच्या तुलनेत कमी असते. आधीच एखाद्या गंभीर आजारासाठी औषध सुरू असेल तर कोरोना झाल्यास त्यांची प्रकृती आणखी ढासळते. ही बाब लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोना संकटाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. शक्यतो घरातच एका खोलीत राहून विश्रांती घ्यावी आणि घरातल्यांशी संवाद साधताना कायम नाक आणि तोंड स्वच्छ हातरुमालाने किंवा मास्क अथवा कापडाने झाकून घ्यावे. तब्येतीची काळजी घ्यावी. आधीपासूनच पथ्य, औषधे सुरू असल्यास त्यात हयगय करू नये, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment