![]() |
शरद पवार यांचा फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद |
“केंद्राच्या सुचना पाळण्याची खबरदारी आपण घेतली तर करोनावर आपण मात करू शकू. तीन आठवड्यानंतर अधिक सुधारणांसाठी लॉकडाउनचा कालावधी नाईलाजानं ३ आठवड्यांसाठी वाढवावा लागला. ३ मेपर्यंत अजून १२ दिवसांचा कालावधी आहे. या काळात आपण काळजी घेतली तर ३ मे नंतर परिस्थितीत बदल होईल. नियमावलीत शिथिलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल याबाबत मनात शंका नाही,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. यादरम्यान त्यांनी काळजी घ्या अजिबात बाहेर पडू नका असं म्हणत मुंबई, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असंही स्पष्ट केलं.
“अमेरिकेसारख्या देशातही आज मृत्यू झालेल्यांची संख्या ४० हजारांच्या वर आहे. स्पेनमध्येही ही संख्या २० हजारांवर तर फ्रान्समध्येही ही संख्या १९ हजारांच्या वर आहेत. काही देश पाहिले तर त्यांचा आकार महाराष्ट्राएवढा आहे. त्या ठिकाणची मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या चिंताजनक आहे. आपल्याला पाश्चिमात्य देशांची तुलना करून चालणार नाही. महाराष्ट्रात वाढणारा आकडा थांबवायचा कसा यासाठी उपाययोजना कराव्या लागतील,” असंही शरद पवार म्हणाले. “महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे या ठिकाणी कठोरपणे नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे. आकडा आपण शून्यावर आणणारचं या आवाहनाला आपल्याला सामोरे जायचंय,” असंही त्यांनी नमूद केलं. “सोशल डिस्टन्सिंगच्या सुचना आपण पाळल्या पाहिजेत. दोन लोकांमध्ये आवश्यक अंतर ठेवून आपण करोनाचा संसर्ग रोखू शकतो. लोकांनी काळजी घेतली तर काही ठिकाणी यातून शिथिलता शक्य आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
करोनाशी लढणाऱ्यांबाबत आत्मियता हवी
“लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. देशातला आणि राज्यातला आकडा चिंताजनक आहे. जे लोक करोनाशी सामना करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी लढत आहे त्यांच्यासाठी आत्मियता दाखवणं आवश्यक आहे. त्यांच्या कुटुंबीयांसोबत आपण आहोत हे आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे. सर्वच यंत्रणा चांगलं काम करत आहेत. पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका दिवसरात्र मेहनत करीत आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पालघर घटना निषेधार्ह
“पालघरला जे झालं त्याचा जो काही संबंध असेल तर त्याची चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर काही तासांमध्ये राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं याची दखल घेतली. अशी प्रकरणं घडायला नको. ते निषेधार्ह आहे. पालघर प्रकरण आणि करोनाचा कोणताही संबंध नाही. या प्रकरणाचं कोणीही राजकारण करू नये,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment