![]() |
मॉर्निंगवॉकला आलेल्या १०० जणांवर कारवाई |
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका हद्द ही कंटेंमेंट झोन म्हणून घोषित केलेली आहे. शहरात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. परंतु, नागरिक मात्र याबाबत अद्यापही गंभीर झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात आज मॉर्निंगवॉकसाठी आलेल्या १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील ९४ जणांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले तर इतर व्यक्तींवर १८८ नुसार कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात काही दिवसांपासून मॉर्निंगवॉक करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघ्या देशात संचारबंदी आणि जमावबंदी आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सर्वप्रकारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र तरी देखील घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून कधी कवायत, कोंबडा तर उठाबशा अशी शिक्षा पोलिसांनी नागरिकांना दिलेल्या आहेत. परंतु, नागरिक मात्र बिनधास्त फिरताना दिसत आहेत. आज देखील सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात मॉर्निंगवॉकसाठी आलेल्या जवळपास शंभर नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. या नागरिकांना एका ठिकाणी बसवले तर यातील काहींना लाठ्याचा प्रसादही मिळाला. काही जणांना कडक शब्दात समज देण्यात आली तसेच यातील काही जणांवर १८८ नुसार कारवाईही करण्यात आली. बाकीच्या व्यक्तींना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले.
करोनाचा फास घट्ट आवळतोय हे अशा नागरिकांच्या लक्षात येत नसल्याचं दिसत आहे. त्यांना पोलिसांनी अद्दल घडवणे महत्वाचे असून इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार या मुठभर लोकांना नाही. ही कारवाई ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
0 comments:
Post a Comment
Please add comment