मुंबईतील झोपडपट्ट्यांवर ड्रोनची नजर

मुंबईतील झोपडपट्ट्यांवर ड्रोनची नजर

मुंबईत अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याचं उघड झाल्याने धारावीसह मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. वांद्रे परिसरात आतापर्यंत १८४ रुग्ण सापडल्याने वांद्र्यातील बेहरामपाडा, भारतनगर, ज्ञानेश्वर नगर आणि पत्थर नगरातील रहिवाश्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचं समोर आल्याने येथील रहिवाश्यांना लाऊडस्पीकरवरून वेळोवेळी सूचनाही देण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.


एच/पूर्व विभागातील बेहराम पाडा, भारत नगर, ज्ञानेश्वर नगर, पत्थर नगर परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एच/पूर्वेच्या सहाय्यक आयुक्तांनी विविध उपायोजना केल्या आहेत. हा संपूर्ण परिसर दाटीवाटीचा आणि झोपडपट्टीने वेढलेला आहे. या परिसरातील लोकसंख्या अधिक असल्याने करोनाचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून महापालिकेने विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या परिसरातील सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये म्हणून येथील रहिवाश्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, फेस मास्क वापरणे, साबणाने हात धुणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना काळजी घेणे, याबाबत जनजागृती करण्यासाठी एच पूर्व विभागातील महानगरपालिकेचे अधिकारी, खेरवाडी पोलीस स्टेशन व बीकेसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी यांच्या सहभागाने संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. करोनाबाबत नागरिकांच्या मनामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले भीतीचे वातावरण कमी करून त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लावण्याकरिता ड्रोनचा वापर प्रभावी ठरत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment