![]() |
खनिज तेलाचा भाव शून्याखाली |
सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थिती अनेक देशामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्याचाच परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवरही होताना दिसत आहे. न्यूयॉर्कमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली.
२० एप्रिल रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत एवढी घसरण झाली की कच्च्या तेलाची किंमत बंद बाटलीतील पाण्यापेक्षाही कमी झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत शून्यापेक्षाही कमी म्हणजेच (उणे) -३७.५६ डॉलर्स प्रति बॅरल इतकी घसरल्याचं पाहायला मिळालं. मे महिन्यात पुरवल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतीत ही घट झाली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सर्वांच्या प्रवासावर बंदी आहे. त्यामुळे मागणीतही घट झाल्यानं कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच सौदी अरेबिया आणि रशियामध्ये सुरू असलेल्या दर युद्धामुळेही मागणीत घसरण झाली आहे. जगभरात कच्च्या तेलाचं उत्पादन वाढलं आहे परंतु मागणीत घट झाल्यानं मोठ्या प्रमाणात दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची किंमत शून्याच्याही खाली गेली याचा अर्थ आता विक्रेतेच खरेदीदारांना खरेदीसाठी पैस देतील असा होतो.
भारतात ८० टक्के आयात
भारत कच्च्या तेलाची ८० टक्के आयात करतो. तसंच भारताला डॉलर्समध्येच याची रक्कम द्यावी लागते. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा फायदा भारताला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण?
कच्च्या तेलाची साठवणुकीची क्षमता वाढवून भविष्यात ग्राहकांना लाभ पोहोचवला जाऊ शकतो. त्यातच पेट्रोल डिझेलच्या दरात घसरणही होण्याची शक्यता आहे. भारत, कॅनडा, दक्षिण कोरिया यांसह ४४ देशांना अमेरिकेकडून कच्च्या तेलाची निर्यात होते. २०१८ मध्ये कच्च तेल आणि नैसर्गिक वायूच्या विक्रीतून अमेरिकेला १८१ बिलियन डॉलर्सचा महसूल मिळाला होता. परंतु सध्या कच्च्या तेलाच्या मागणीत झालेल्या घसरणीचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो. या कंपन्यांवरील कर्जाच्या ओझ्यामुळे बँकींग आणि फायनॅन्शिअल सेक्टवरही धोका वाढत असल्याचं म्हटलं जात आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment