coronavirusUpdates | मुंबईतील १४६ ठिकाणं सील करण्याचा निर्णय

coronavirusUpdates | मुंबईतील १४६ ठिकाणं सील करण्याचा निर्णय
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव रोखण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील १४६ ठिकाणं सील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी करोनाचे रूग्ण सापडले आहेत किंवा ज्या ठिकाणी करोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊन करोनाची लागण झाली आहे, अशी ठिकाणं पालिकेच्यावतीनं सील करण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीनं बॅरिकेंटींग करून हे परिसर सील करण्यात आले आहेत. तसंच या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची खबरदारीही पालिकेतर्फे घेण्यात येत आहे.
यामध्ये दक्षिण मुंबईतील ४८ जागा आहेत. यात मलबार हिल्स, वाळकेश्वर, पोद्दार रोड, बेलासिस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीसारख्या परिसरांचा समावेश आहे. वरळी कोळीवाडा परिसरातील करोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी वाढ होऊन ती १० वर पोहोचली. अन्य दोन संशयितांची करोनाची चाचणी करण्यात आल्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं. हिंदुस्थान टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तर प्रभादेवी येथील एका चाळीतही १३ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या ठिकाणी खानावळ चालवणाऱ्या एका महिलेला करोनाची लागण झाल्याच २४ मार्च रोजी निष्पन्न झालं होतं.
दरम्यान, वरळी कोळीवाड्यातील लोकसंख्या ही जवळपास ८० हजारांच्या घरात असून प्रत्येकाची करोनाची चाचणी करणं शक्य नसल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्या ठिकाणी आता आरोग्य कॅम्प सुरू करण्यात येणार असून त्या ठिकाणी २४ तास डिस्पेन्सरी आणि एक रूग्णवाहिकाही ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू पोहोचवणं हे आमच्यापुढील आव्हान असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.
तर दुसरीकडे मुंबईतील पश्चिम भागातील ४६ ठिकाणं सील करण्यात आली आहेत. यामध्ये वांद्रे पश्चिम आणि खास या ठिकाणांचा प्रामुख्यानं समावेश आहे. या ठिकाणांमध्ये हिल रोड, एसव्ही रोड, वांद्रे गव्हरमेंट कॉलनी, बिंबिसार नगर यांचा समावेश आहे. सोमवारी बिंबिसारनगर मधील इंग्लंडमधून आलेली एक महिला पॉझिटिव्ह सापडली होती. त्यानंतर हा भागही सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर पालिकेनं संबंधित महिलेच्या कुटुंबीयांचीही करोनाची चाचणी केली आहे.
पूर्वेकडील ४८ ठिकाणं पालिकेनं सील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्यानं चेंबूर आणि घाटकोपमधील ३५ ठिकाणांचा समावेश आहे. आम्ही या ठिकाणी पोलिसांच्या मदतीनं ‘नो-गो झोन’ सुरू केली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली. याव्यतिरिक्त मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेसी यांनी होम क्वारंटाईनसाठी हॉटेल, वसतिगृहे, लॉज, धर्मशाळा, मंगल कार्यालये, सभागृहे, रिकाम्या इमारती, जिमखाना, संस्था, जहाजे (क्रूझ), महाविद्यालये, क्‍लब इत्यादी इमारती महापालिका ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.
याव्यतिरिक्त कोरोना रुग्ण किंवा होम क्वारंटाईनमधील व्यक्तीच्या गृहसंकुल परिसरात आठवड्यातून एकदा निर्जुंतुकीकरण करण्यात येणार आहे. तर कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात दररोज आणि इतर सार्वजनिक रुग्णालये, दवाखाने, हेल्थ पोस्ट, विभाग कार्यालयांचे आठवड्यातून एकदा निर्जुंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment