Corona: ४ तारखेला अर्धा देश खुला ? |
सध्या लागू असलेलं राष्ट्रीय लॉकडाऊन देशातील बहुतांश जिल्ह्यातून उठवणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. अनेक राज्यांची मागणी लक्षात घेता हॉटस्पॉटमध्ये हे लॉकडाऊन कायम राहिल, मात्र देशात ३०० पेक्षा जास्त असे जिल्हे आहेत, तिथे एकही रुग्ण सापडलेला नाही. दरम्यान, ३ मेपर्यंत कडक लॉकडाऊनचं पालन करणं आवश्यक असल्याचंही गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.
देशातील उद्योगांची सुरुवात करण्यासाठी गृह मंत्रालयाने विविध आदेश काढून आतापर्यंत सूट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मे रोजी राष्ट्रीय लॉकडाऊनची घोषणा केली, हे लॉकडाऊन पुन्हा ३ मेपर्यंत वाढवण्यात आलं. देशभरातील लॉकडाऊनचा आढावा घेतल्यानंतर गृह मंत्रालयाने विविध ट्वीट केले आणि यातून देशातील बहुतांश भागातील लॉकडाऊन मागे घेण्याबाबत संकेत दिले.
लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचं आढावा बैठकीतून समोर आलं असं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. करोनाशी लढण्यासाठी नवीन नियमावली ४ मेपासून लागू होईल, ज्यात विविध जिल्ह्यांना मुबलक सूट देण्यात येईल. येत्या काही दिवसात याबाबतचा तपशील समोर आणला जाईल, असं ट्वीट गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केलं. लॉकडाऊनची नियमावली २४ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लागू करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा २० एप्रिलपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली.
देशातील काही राज्य लॉकडाऊन वाढवण्यासाठी आग्रही आहेत. तेलंगणाने अगोदरच लॉकडाऊन ७ मार्चपर्यंत वाढवलं आहे. तर पंजाबने लॉकडाऊन वाढवत सकाळी ७ ते ११ या काळात लोकांना घराबाहेर पडण्यासाठी सूट दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे लॉकडाऊनमुळे संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत झाली आहे. बुधवारी देशातील हॉटस्पॉटची संख्या १७० वरुन १२९ वर आली आहे. मात्र याच काळात संसर्ग मुक्त किंवा ग्रीन झोन जिल्ह्यांची संख्याही ३२५ वरुन ३०७ वर घसरली आहे. याशिवाय ऑरेंज झोनची संख्या २०७ वरुन २९७ वर आली आहे. प्रशासनाच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे ३२५ जिल्ह्यात एकही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही, असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment