“आम्ही दिलेल्या रॅपिड टेस्ट किट उत्तम, भारतीयांना वापर कळत नाही”-चीन

“आम्ही दिलेल्या रॅपिड टेस्ट किट उत्तम, भारतीयांना वापर कळत नाही”-चीन
चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्ट किट सदोष असल्याची तक्रार अनेक राज्यांमधून करण्यात आली आहे. यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तूर्तास या किट्सचा वापर थांबवण्याचा आदेश दिला आहे. मात्र चीनमध्ये या रॅपिड टेस्ट किटची निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या किटमध्ये काही समस्या नसून भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा दावा करत भारतावरच खापर फोडलं आहे. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
भारतात एकूण पाच लाख टेस्टिंग किट आयात करण्यात आल्या होत्या. चीनमधील दोन कंपन्या Wondfo Biotech आणि Livzon Diagnostics यांच्याकडून हे किट पाठवण्यात आले होते. करोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये या किटचं वाटप करण्यात आलं होतं. राजस्थान आणि पश्चिम बंगाल सरकारने हे किट चुकीचे निकाल दाखवत असल्याची माहिती दिली होती. याची दखल घेत आयसीएमआरने सर्व राज्यांना किटचा वापर थांबवण्याचा आदेश दिला. या किटचा वापर फक्त पाळत ठेवण्यासाठी केला जावा असं सांगण्यात आलं.
आयसीएमआरकडून या किटचं टेस्टिंग केलं जात असून जर किट सदोष आढळले तर चीनमधील या कंपन्यांसोबतचा करार रद्द करण्यात येईल अथवा त्यांना नव्याने किट पाठवण्यास सांगण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान किटवरुन वाद निर्माण होऊ लागल्यानंतर चीनमधील संबंधित कंपन्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं असून आपल्या किटमध्ये कोणताही दोष नसून जगभरात ते पाठवले जात असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी किटचा सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे योग्य रितीने वापर करावा असा सल्लाही दिला आहे.
भारतातील संसर्गजन्य रोग तज्ञांनी मात्र चीनच्या कंपन्यांनी घाईत किट तयार केले असल्याचा आरोप केला आहे. “चीनने किटची निर्मिती करण्याआधी त्यांची योग्य चाचणी केली असं वाटत नाही. चीनने फार कमी रुग्णांवर हे टेस्ट वापरुन पाहिलं असावं. जगभरातील मागणी लक्षात घेता त्यांना आपलं किट बाजारात पाठवण्याची घाई होती असं दिसतंय,” असं डॉक्टर मुबाशीर अली यांनी म्हटलं आहे.
चीनी कंपन्यांनी काय म्हटलं आहे –

चीनच्या Wondfo Biotech कंपनीने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, आमची कंपनी आयसीएमआरला पूर्ण मदत करत होती. आयसीएमआरने एनआयव्ही  पुणेच्या माध्यमातून किटची चाचणी केल्यानंतर २० मार्च रोजी आपल्याला भारताकडून आयात करण्यासाठी परवाना मिळाला. आपण ७० देशांमध्ये टेस्टिंग किट आयात केलं असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे. स्पेन, ब्राझील, इंडोनेशिया या देशांमध्ये १० लाखांहून जास्त टेस्टिंग किट पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

तर Livzon Diagnostics ने स्पष्टीकरण देताना चीनमधील हजारो रुग्णालयांमध्ये किटचा वापर केला जात असून आपल्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही कंपन्यांनी किट वापरताना त्याच्यावर दिलेल्या सूचनांचं पालन केलं तरच योग्य निकाल मिळेल असं म्हटलं आहे. तसंच ते योग्य तापमानात स्टोरेज करणंही महत्वाचं असल्याचं सांगितलं आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment