सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत - भाजपा नेते नारायण राणे

 सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत - भाजपा नेते नारायण राणे 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजभवनावर केलेल्या टीकेला भाजपा नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून सत्तेची मस्ती आल्यानेच संजय राऊत यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्दांचा वापर होत असल्याचं म्हटलं आहे. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे. करोनामुळे विधान परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवड राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करावी, या राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप निर्णय न घेतल्याने राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका करणारं ट्विट केलं होतं. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही, पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,’ असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली होती.

त्यांच्या या टीकेवर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून राजभवनावर टीका केल्याबद्दल संजय राऊत यांना उत्तर देत म्हटलं आहे की, “राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है!”. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये संजय राऊत यांनी टॅगदेखील केलं आहे.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसलेल्या मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहात आमदार होऊन निवडून यावे लागते. एप्रिलमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होत्या; पण मार्चमध्ये करोनाचे देशव्यापी संकट आल्याने त्या निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यामुळे २७ मे २०२० पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार व्हावे यासाठी त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे, अशी शिफारस दहा दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली.
मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता शिवसेनेचा संयम सुटल्याचे स्पष्ट दिसते. राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा होऊ नये. कळत नाही, पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची गच्छंती झाली होती याकडे राऊत यांनी लक्ष वेधले आहे. रामलाल यांनी आंध्र प्रदेशमध्ये एन. टी. रामाराव यांच्याकडे बहुमत असतानाही त्यांचे सरकार बरखास्त के ले होते व त्यातूनच त्यांची हकालपट्टी झाली होती.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment