अर्थचक्र पुन्हा सुरु करण्याच्या विचारात असणाऱ्या देशांना बिल गेट्स यांचा सल्ला

अर्थचक्र पुन्हा सुरु करण्याच्या विचारात असणाऱ्या देशांना बिल गेट्स यांचा सल्ला
करोनामुळे जगातील अनेक देशांना आर्थिक फटका बसाल आहे. जगभरातील अनेक देशांची वाटचाल आर्थिक मंदीच्या दिशेने सुरु आहे. भारत आणि चीन वगळता अनेक देशांमध्ये विकासदर नकारात्मक असतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अहवालामध्येही नमूद करण्यात आलं आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता अनेक देशांमध्ये एका महिन्याहून अधिक कालावधीसाठी लॉकडाउन सुरु असून हळूहळू लॉकडाउनचे नियम शिथिल करत अर्थचक्र सुरु करण्यासंदर्भात सरकारी यंत्रणा देशांमधील मोठ्या उद्योजकांशी चर्चा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी एका ब्लॉगच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग थांबवून अर्थव्यवस्था कशी पुन्हा सुरु करता येईल याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
बिल गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमधून अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्याच्या विचारात असणाऱ्या सर्व देशांना काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. करोवाविरुद्धच्या लढाईची तुलना गेट्स यांनी महायुद्धाशी केली आहे. “ही परिस्थिती महायुद्धासारखीच असून  फरक फक्त इतका आहे की या लढाईमध्ये सर्व देश एकाच बाजूने आहेत,” असं गेट्स म्हणाले आहेत.
संशोधन काळाची गरज…
करोनाच्या चाचण्यांसंदर्भात नव्या पद्धतीने विचार करणे, लस शोधणे आणि सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांच्या जोरावरच करोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल असं गेट्स यांनी नमूद केलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गरजेनुसार अनेक महत्वाचे शोध लावण्यात आले याची आठवण करुन देताना गेट्स यांनी रडार, टॉरपीड, कोड-ब्रेकिंगच्या शोधांची आठवण करुन दिली. या शोधांमुळे युद्ध लवकर संपण्यास मदत झाल्याचे सांगत गेट्स यांनी सध्याचा काळ हा संशोधनाचा असल्याचे म्हटले आहे.
या पाच गोष्टींबद्दल निर्णय घ्या…
करोनाशी लढा देण्यासाठी पाच मुख्य गोष्टींबद्दल विचार करणे गरजेचे आहे असं मत गिट्स यांनी व्यक्त केलं आहे. यामध्ये त्यांनी उपचार, लस, तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करणे या पाच गोष्टींसंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. या गोष्टींबद्दल योग्य निर्णय घेतले तरच परिस्थिती सुधरेल असं गेट्स म्हणाले आहेत.
बेरोजगारी कधीच एवढी वाढली नव्हती…
करोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे सांगताना गिट्स यांनी इतक्या वेगाने आतापर्यंत कधीच बेरोजगारी वाढली नव्हती असं म्हटलं आहे. संपूर्ण जगभरात अनेक क्षेत्रांमध्ये काम बंद आहे. हे सर्व निर्णय अचानक घ्यावे लागल्याने यासंर्भात आता सरकारने अधिक योग्य पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे असं गेट्स म्हणाले आहेत.
लस हा एकमेव उपाय…
सर्वांनाच घराबाहेर पडण्याची भिती वाटत आहे. त्यामुळेच या आजारावर लस शोधण्याची गरज आहे. असं झाल्यास लोकांना अधिक सुरक्षित वाटेल आणि तेव्हाच ते घराबाहेर पडतील. लस हा एकमेव उपाय यावर आहे. जोपर्यंत आपल्याला लस सापडत नाही तोपर्यंत जग पूर्वीसारखे होणार नाही, असं गेट्स यांनी म्हटलं आहे.
लस सापडल्यानंतर…
जेव्हा लस सापडेल तेव्हा जगातील सर्व लोकांना म्हणजेच जवळजवळ ७०० कोटी लोकांना ही लस देण्यात यावी, असं मत गेट्स यांनी व्यक्त केलं आहे. इतकचं नाही तर लस शोधल्यास त्याची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात करावी लागेल. तसं न केल्यास लस मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु होईल आणि त्यामधून अधिक गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही गेट्स यांनी दिला आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment