PCMCचे ९८४ कोटी ‘येस’ बँकेत अडकले

Image result for pcmc
PCMCचे ९८४ कोटी ‘येस’ बँकेत अडकले

'येस' बँक अडचणीत असून, बँकेच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने चार महिन्यांपूर्वीच आयुक्तांना दिले होते. मात्र, आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज सर्वसामान्य शहरवासीयांनी कररूपाने भरलेले पैसे बँकेत अडकले आहेत. दरम्यान, 'येस' बँक ही खासगी बँक असूनही फक्त बँकेतील मोठ्या पदावर काम करणाऱ्या आपल्या नातेवाइला खूष करण्यासाठीच आयुक्तांनी या बँकेत पैसे टाकण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

महापालिकेच्या सोळा कर संकलन केंद्रांची जमा झालेली तब्बल ९८४ कोटींची दैनंदिन रक्कम 'येस' बँकेत अडकली आहे. 
'येस' बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील 'येस' बँकेवर गुरुवारी (५ मार्च) निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे आता बँकेच्या खातेदारांना महिन्याला अवघे ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेलादेखील पैसे काढता येणार नाहीत. त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची भिती आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न महापालिका विविध बँकांमध्ये जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी ठेवीच्या स्वरूपात ठेवला जातात. 'येस' बँक खासगी असल्याचे माहिती असूनदेखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने अधिक व्याजाच्या अपेक्षेने २०१७ पासून बँकेत दैनंदिन कर संकलनाची रक्कम ठेवण्यास सुरुवात केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीदेखील त्याला मान्यता दिली. बँकेत पालिकेची सुमारे ९८४ कोटी रुपयांची रक्कम आहे. त्यावर ८.१५ टक्के व्याज मिळत होते. परंतु, सरकारने बँकेवर घातलेल्या निर्बंधामुळे पालिकेला आता मोठा झटका बसला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुणे महापालिकेनेदेखील 'येस' बँकेत काही रक्कम ठेवली होती. परंतु, बँकेची पत खालावताच महापालिकेने ३६६ कोटींची रक्कम वेळीच काढून घेतली. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेला 'येस' बँकेबाबतची कल्पना असूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने चार महिन्यांपूर्वी याबाबतचे पत्र पालिकेला देऊनही त्यावर साधी चर्चाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली नाही. त्यामुळे पुण्यासारखे शहानपण पिपंरी-चिंचवड महापालिकेने का दाखविले नाही, असा प्रश्न आता विरोधकांमधून विचारला जात आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment