उबर चालक झोपला;प्रवासी तरुणीनं स्टेअरिंगचा ताबा घेतला

उबर चालक झोपला;प्रवासी तरुणीनं स्टेअरिंगचा ताबा घेतला

पुणे-मुंबई प्रवासादरम्यान 
उबर चालक चक्क डुलक्या घेत असल्याचं लक्षात येताच, प्रवासी तरुणीनं स्टेअरिंगचा ताबा घेतला आणि कार मुंबईला आणली. या प्रकारानंतर तिनं तक्रार केल्यानंतर कंपनीनं या गंभीर प्रकाराची दखल घेतली आहे.

ही तरूणी मुंबईतील अंधेरीत राहते. तिचे पालक पुण्यातील वानवडी परिसरात राहतात. त्यामुळं त्यांना भेटण्यासाठी ती वानवडीत गेली होती. तिथे राहिल्यानंतर ती मुंबईला परत निघाली. तिनं उबरची कॅब बुक केली, अशी माहिती या तरुणीनं 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिली. घडल्या प्रकाराची जबाबदारी उबर व्यवस्थापनानं घ्यावी यासाठी पाठपुरावा करत आहे. आता कॅब बुकिंग करण्याची भीती वाटते, असंही ती म्हणाली. दरम्यान, ही खेदाची आणि चिंतेची बाब असल्याचं उबरच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. संबंधित चालकाचा अॅप अॅक्सेस निलंबित करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.या धक्कादायक प्रकाराबाबत संबंधित तरुणीनं माहिती दिली. माझ्याकडे चार बॅग होत्या. सोबत लॅपटॉपही होता. मी उबर कॅब बुक केली होती. दुपारी साधारण एकच्या सुमारास कार एक्स्प्रेस-वेवर आली. चालक डुलक्या घेत असल्याचं माझ्या लक्षात आलं. काळजीपूर्वक कार चालव असं मी त्याला सांगितले. त्यानंतर मी माझ्या वडिलांशी फोनवर बोलू लागले. पहिलाच टोलनाका सोडल्यानंतर चालक डुलक्या घेत असल्यानं दोन अपघात होताहोता टळले. एकदा तर कारला धडक दिली असती, तर दुसऱ्यांदा दुभाजकाला कॅब धडकली असती, असं तरुणीनं सांगितलं. एका क्षणी कारमधून उतरावं असा विचार मनात आला होता. पण एक्स्प्रेस वेवर दुसरी कॅब किंवा कार मिळणं कठीण होतं. अखेर मी कार चालवण्याचा विचार केला. मी कार चालवते असं चालकाला सांगितलं. त्याला कार रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितलं. तो तयार झाला आणि नंतर चालकाच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. मी अंधेरीपर्यंत कार चालवली. मी घरी पोहोचायच्या २० मिनिटे आधी तो झोपेतून जागा झाला, असंही या तरुणीनं सांगितलं.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment