![]() |
‘पूर्णा’तील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान |
औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडशी येथील विठ्ठल पावडे, किसन पावडे, नामदेव हराळ, संतोष शेळकेसह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासोबतच जमिनीचेही मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांप्रमाणेच वसमत येथील शेतकरी संघटनेचे गोरख पाटील, अॅड. रामचंद्र बागल यांनीही पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन कालव्यातील पाण्याच्या पाझरामुळे शेत जमीन व पिकांचे नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधले. पाण्याची होणारी नासाडी टाळण्यासाठी कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे.
पूर्णा प्रकल्पाअंतर्गत येलदरी, सिद्धेश्वर धरण येते. हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यतील शेतकऱ्यांची तहान-भूक या धरणावर अवलंबून आहे. कालवा समितीच्या निर्णयावरून सिद्धेश्वर धरणातून रब्बीच्या दोन पाळ्याचे पाणी सोडण्यात आले. मात्र कालवे, चाऱ्यांची दुरुस्ती नसल्याने पाण्याची नासाडी झाली असून कालवा पाझरत असल्यामुळे अनेकांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
गेल्या दहा वर्षांत येलदरी, सिद्धेश्वर धरणात अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. तर तीन वर्षे दुष्काळाच्या खाईत शेतकरी होरपळला गेला. यावर्षी परतीच्या पावसाने दोन्ही धरणे तुडुंब भरली. मात्र कालवा सल्लागार समितीच्या निर्णयावरून सिद्धेश्वर धरणातून दोन रब्बी पिकाच्या पाणी पाळ्याचे पाणी शनिवापर्यंत सोडण्यात आले. परंतु वर्षांनुवर्षांपासून कालवे, चाऱ्याची, दुरुस्ती, सफाई केवळ निधीअभावी रखडली. सोडलेल्या दोन पाणी पाळ्यातील पाण्याची नासाडी झाली. कालव्यातील पाण्याच्या पाझरामुळे अनेकांच्या शेतीत पाणी शिरले असून जमीनही चिभडली गेली आहे.
निधीअभावी दुरुस्ती रखडली
कालवा समितीच्या निर्णयाप्रमाणे दोन पाणी पाळ्याचे पाणी सोडले. कालव्याची सफाई, दुरुस्तीसाठी एक वेगळा विभाग आहे. गेली काही वर्ष धरणातून अपेक्षित पाणी साठा उपलब्ध नसल्याने कालवे, चाऱ्यांची दुरुस्ती, सफाईचे काम झाले नाही. दुरुस्तीसाठी भरघोस निधीची आवश्यकता असून हे काम आमच्या आक्याबाहेरचे आहे. दुरुस्तीचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून घेतला जातो. वरिष्ठ स्तरावरून दुरुस्तीबाबत निर्णय घेतला व निधी उपलब्ध करून दिला तरच काम मार्गी लागेल.
0 comments:
Post a Comment
Please add comment