सोसायटीधारक भीतीच्या सावटाखाली; मलेशियाहून परतणाऱ्या कुटुंबाला ‘नो’ एन्ट्री

जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने, सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत पाच रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काळजी घेत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये एक वेगळा प्रकार समोर आला आहे. सहलीसाठी मलेशियाला गेलेल्या येथील एका कुटुंबालाच सोसायटीत प्रवेश न करू देण्याचा सोसायटीधारकांनी निर्णय घेतला आहे. करोनाच्या धास्तीनेच सोसायटीधारकांनी असा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
करोनामुळे अनेकजण जास्तच धास्तवल्याचे दिसत आहे, गैरसमज पसरत आहेत. मलेशियाला सहलीसाठी गेलेले पिंपरी-चिंचवड शहरातील एक उच्च शिक्षित कुटुंब आता घरी परतत आहे. परंतु, कालच पुण्यात दुबईहून आलेल्या पती पत्नीला करोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने, सोसायटीधारकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. मलेशियाहून येणाऱ्या या कुटुंबाला सोसायटीत येऊ देऊ नये, यासाठी  सोसायटीधारकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकारामुळे पोलीस देखील हतबल झाले आहेत. कारण, एखाद्या कुटुंबाला पोलीस प्रशासन देखील त्यांच्याच घरात येण्यास रोखू शकत नाही. त्यामुळे धास्तावलेले सोसायटीधारक आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, संबंधित कुटुंब हे मलेशियाहून मायदेशी परतल्यानंतर विमानतळावर त्यांची वैद्यकीय तपासणी होणारच आहे. त्यानंतर त्यांना राहात असलेल्या ठिकाणी सोडलं जाईल. परंतु, त्या अगोदरच सोसायटीधारकांचा संयमाचा बांध सुटला आहे. ते अत्यंत भीतीच्या सावटाखाली असून चिंतेच्या वातावरणात आहेत.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment