![]() |
ऑक्सिजनची नळी मोदी फेकणार नाहीत: शिवसेना |
सोशल मीडिया सोडण्याचा माझा विचार आहे, असं ट्विट मोदींनी परवा केलं होतं. त्यानंतर मंगळवारी दिवसभर चर्चा सुरू झाली. राजकीय विरोधकांनी त्यावर टोलेबाजी केली तर मोदी समर्थकांनी त्यांना हा निर्णय न घेण्याची गळ घातली. या संपूर्ण घडामोडीवर शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून तिरकस शब्दांत भाष्य करण्यात आलं आहे.
'आपले पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे अभिनयनिपुण आहेत. ते कधी कोणती नाट्यछटा सादर करतील याचा नेम नाही. सोशल मीडिया सोडण्याची त्यांची घोषणा याचाच एक भाग होती. पण सोशल मीडियाचं व्यासपीठ हाच भाजपचा ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनची ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्यच,' असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
अग्रलेखातील ठळक मुद्दे:
खरंतर ‘सोशल मीडिया’ हा तर भाजपचा पंचप्राणच! २०१४ चा लोकसभा रणसंग्राम भाजपने सोशल मीडियावर सायबर युद्ध करूनच जिंकला. गोबेल्स नीतीचा वापर त्या वेळी झाला व काँग्रेस राजकीय पटलावरून अदृश्य झाली. पण भाजपच्या सायबर फौजेचे सेनापती नरेंद्र मोदी हेच मैदान सोडून निघून जात आहेत, असा संदेश पंतप्रधानांच्या कालच्या ट्विटमुळे गेला किंवा तो जाणीवपूर्वक तसा जाऊ दिला गेला. त्यावरून चर्चेचे घमासान सुरू झाल्यानंतरही लगेच खुलासा न करता चर्वितचर्वणाचा प्रयोग रंगू दिला गेला. नाट्य पुरेसे रंगले आहे हे ध्यानात आल्यानंतर नवा क्लायमॅक्स पुढे करून धक्का देण्याचे तंत्र खुबीने वापरले गेले.
आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत कुशलतेने करण्यात मोदी पटाईत आहेत. साडेपाच कोटींपेक्षा जास्त लोक मोदी यांना ट्विटरवर ‘फॉलो’ करतात. मोदींचे फेसबुक पान पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचते. इन्स्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून मोदी रोज कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतात. आता हे सर्वकाही सोडण्याचा निर्णय मोदी घेतीलच कसा? कारण सोशल मीडियाचा वापर म्हणजे नशापाणी नसले तरी त्याची एक धुंदी आणि अंमल असतोच. ती धुंदी इतक्या सहजासहजी सुटणे कठीणच.
0 comments:
Post a Comment
Please add comment