विधानसभा अध्यक्ष संतापले......

Image result for nana patole vidhan sabha
विधानसभा अध्यक्ष संतापले,मुख्य सचिवांना थेट शिक्षा

विधानसभेत मागील अधिवेशनात ८३ औचित्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्यातील केवळ ४ मुद्यांना प्रशासनाने उत्तर दिले आहे.
नियमानुसार औचित्याच्या मुद्यांना एका महिन्यात उत्तर द्यावे लागते. या दिरंगाईबद्दल विधिमंडळ प्रशासन वारंवार पाठपुरावा करत होते. तर विधानसभा अध्यक्षांनीही मुख्य सचिवांना फोन करून याची कल्पना दिली होती. मात्र तरीही उत्तरे मिळत नसल्याने अध्यक्ष अखेर भडकले आणि त्यांनी थेट मुख्य सचिवांना शिक्षा सुनावली.

विधिमंडळातील कामकाजाबाबत प्रशासकीय अधिकारी गांभीर्य दाखवत नसल्याने सोमवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा पारा चांगलाच चढला होता. यावेळी रागाच्या भरात नाना पटोले यांनी थेट राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना विधानसभेच्या प्रवेशद्वारावर येऊन माफी मागण्याची आदेश दिले.
मुख्य सचिवांना थेट अशी शिक्षा सुनावण्याची विधिमंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे विधानसभेत बसलेले सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते चांगलेच हादरले होते. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांना विनंती केल्यानंतर ही शिक्षा मागे घेण्यात आली.
आता शिक्षा मागे घेत असलो तरी भविष्यात असे घडू नये, याची काळजी घेण्याचा इशारा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिला आहे. अध्यक्षांच्या या आक्रमक पावित्र्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना ही शिक्षा मागे घेण्याची विनंती केली. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल मी उपमुख्यमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात असे घडणार नाही, याची मी खात्री देतो. मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवून मुख्यमंत्री आणि मी सक्त सूचना देतो, असे अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांना सांगितले. 
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या भावना आपण समजू शकतो, असे सांगत कोणावरही कारवाई करताना आपल्याकडे बोलवून त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. तर स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी शासनातर्फे क्षमा मागितली असल्याने आपण बोलवून घ्या आणि कडक समज द्या आणि शिक्षा मागे घ्या अशी विनंती फडणवीस यांनी अध्यक्षांना केली.
या सगळ्या प्रकारानंतर नाना पटोले यांनी म्हटले की, सभागृहाचे पावित्र्य राखले जात नसेल तर कडक भूमिका घेणे भाग असते. तहसीलदार, ठाणेदारही आमदाराचा मान ठेवत नाहीत. या पद्धतीने प्रशासनाची वागणूक असेल आणि आमदारांच्या तक्रारी आल्या तर मी यापुढे मुख्य सचिवांनाच जबाबदार धरेन. मी जोपर्यंत या खुर्चीवर आहे तोपर्यंत हा अपमान सहन करणार नाही, असे सांगत पटोले यांनी मुख्य सचिवांना सुनावलेली शिक्षा मागे घेतली.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment