मुंबईकर सर्दी-खोकल्याने बेजार होण्याची भीती

Image result for sadi khokla
मुंबईकर सर्दी-खोकल्याने बेजार होण्याची भीती

सकाळी वातावरणात पसरलेला गारठा, दुपारी जाणवलेले किंचित ऊन आणि परत गारवा असा मुंबईकरांचा रविवार सरला. मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतर वातावरणात अचानक गारवा पसरला आहे. १४ मार्चपर्यंत किमान तापमान १७ ते १८ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. तर, कमाल तापमानही २९ अंशांपर्यंत राहील. वातावरणात अचानक गारवा पसरल्याने सर्दी-खोकल्याच्या आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे करोनाचीही चर्चा सुरू झाली आहे. येत्या काळात वातावरणात असेच अचानक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मुंबईमध्ये रविवारी सांताक्रूझ येथे किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर, कुलाबा येथे १९.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे २.७ आणि २.३ अंशांनी कमी होते. कमाल तापमान सांताक्रूझ येथे तब्बल ३.१ अंशांनी सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले. सांताक्रूझ येथील कमाल तापमान २९ अंश, तर कुलाबा येथे २९.६ अंश सेल्सिअस तापमान होते. ११ मार्चपर्यंत आभाळ ढगाळ राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तापमान खाली उतरले. पश्चिमी प्रकोपानंतर वातावरणामध्ये हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुन्हा एकदा १० मार्चपासून नवा पश्चिमी प्रकोप वातावरणावर परिणाम करण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून बाष्पामुळे पंजाब, हरियाणा, चंदिगढ, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश येथे सर्वदूर पावसाची शक्यता आहे. ११ आणि १२ मार्च दरम्यान राजस्थान आणि तुरळक पावसाचा अंदाज आहे. या काळात मुंबईच्या तापमानावरही परिणामाची शक्यता वर्तवली आहे.

शुक्रवारी रात्री मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. वातावरणामध्ये अचानक होणाऱ्या या बदलांबद्दल सांगताना स्कायमेटचे मुख्य हवामानतज्ज्ञ महेश पालवत यांनी फेब्रुवारीपर्यंत पश्चिमी प्रकोपांचे प्रमाण भारतात आढळून येते मात्र यंदा मार्चच्या मध्यापर्यंत पश्चिमी प्रकोप सुरू असल्याचे नमूद केले. ही परिस्थिती दुर्मिळ आहे. हा थेट जागतिक तापमानवाढीचा परिणाम म्हणता येणार नाही. मात्र आता वातावरणात हळुहळू बदल होत आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी थंडीप्रमाणेच उन्हाळ्यातही काही वेळा कमालीची तीव्रता अनुभवायला येईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू, राजस्थान विद्यापीठाचे कुलगुरू, रसायनशास्त्र आणि पर्यावरणशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अरुण सावंत यांनी सध्या वातावरण सतत बदलते आहे, असे सांगितले. तापमानातील अनियमिततेसाठी प्रदूषणही कारणीभूत आहे. क्लाऊड सीडिंगच्या प्रयोगांचे परिणाम नंतर दिसू शकतात, अशीही शक्यता त्यांनी वर्तवली. बदलत्या ऋतूपेक्षा वेगळे परिणाम सध्या जाणवत आहेत. उन्हाळा आला की तापमान तर वाढेल, मात्र यावेळी पाऊसही पडू शकतो अशी सध्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत अचूक हवामान अंदाज वर्तवणारी यंत्रणा गरजेची आहे. मात्र अशी यंत्रणा नसल्याने अन्नधान्याचे मोठे नुकसान होत आहे. बेमोसमी पाऊस, थंडी आणि उन्हाचा परिणाम आरोग्यावरही होण्याची शक्यता आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment