![]() |
CoronavirusUpdates | ऐन पाडव्यात सोने आणि वाहन बाजारात निराशा |
बाजारात सर्वत्र करोनाचे सावट असल्यामुळे सध्या सोने-चांदी आणि वाहन बाजार ठप्प झाला आहे. गर्दी टाळण्यासाठी सध्या लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी सराफांवर दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणारी अपेक्षित खरेदी होणार नसल्याने व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. या काळात वाहन खरेदीलाही जोर येतो. आधीच मंदीमुळे घेरलेल्या या क्षेत्राला करोना विषाणूने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणखी फटका बसणार आहे. ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’ची ३५ दुकाने महाराष्ट्रात आहेत. ही सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. यात कोटय़वधींचे नुकसान होईल,’ अशी प्रतिक्रिया पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी दिली. ‘राज्यभरात आमची २५ दुकाने आहेत. त्यातील ८ दुकाने आतापर्यंत बंद होती. यापुढे ३१ मार्चपर्यंत सर्वच बंद ठेवावी लागतील. शिवाय लोक खरेदीसाठी बाहेर पडत नसल्याने अपेक्षित विक्रीच्या १० टक्केही विक्री होत नाही,’ असे वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक आदित्य पेठे म्हणाले.
‘दादरमध्ये प्रत्येक गल्लीतील दुकाने एक दिवसाआड बंद आहेत. पाडव्याच्या दिवशी मात्र सर्व दुकाने सुरू ठेवण्यासाठी आम्ही पालिके कडून परवानगी घेतली आहे. प्रत्येक दागिन्यासाठी ८ ते १० कारागीर काम करतात. सध्या कारागीरच उपलब्ध नाहीत. त्यामुळे दागिन्यांची घडवणूक बंद आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार दागिने तयार करून देता येत नाहीत. तयार दागिन्यांवर भर दिला जात आहे,’ अशी माहिती जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक अभिषेक पेडणेकर यांनी दिली. ‘भविष्यात काय होईल सांगता येत नाही. सरकारने पूर्ण महाराष्ट्र बंद ठेवायचा म्हटले तर सुरक्षेच्या दृष्टीने पाठिंबा द्यावा लागेल,’ असेही ते म्हणाले.
सोने कारागीर माघारी परतल
मुंबई : हिरे व्यापाराचे केंद्र असलेले भारत डायमंड बोर्स पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापैकीय समितीने शुक्रवारी घेतला. याआधी येथील व्यवहार काही प्रमाणात सुरू होते. मात्र शनिवारपासून हे केंद्र आणि व्यवसाय, व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय समितीने घेतला.
वांद्रे कुर्ला संकुल येथे भारत डायमंड बोर्सची प्रशस्त इमारत आहे. तेथे सुमारे तीन हजार हिरे व्यापाऱ्यांची कार्यालये आहेत. व्यापारानिमित्त येथे दररोज ४० ते ५० हजार व्यक्तींची ये-जा असते. समितीच्या वतीने किरीट भन्साली यांनी सांगितले की, करोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून येथील व्यापार ४० टक्के सुरू होता. मात्र शासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून जारी केलेल्या आदेशांनुसार शनिवारपासून हे केंद्र पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
करोनामुळे शहरातील सोने-चांदीच्या दागिन्यांचे कारखाने थंड आहेत. किरकोळ बाजारपेठेतून मागणी कमी झाल्याचा परिणाम कारखान्यांवर झाला. कारखान्यांतील ९० टक्के कारागीर पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि काम नसल्याने यातील सुमारे ४० टक्के कारागीर आपापल्या गावी परतले, काही परतण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती सराफा व्यावसायिक आणि संघटनेचे पदाधिकारी मनसुख कोठारी यांनी दिली.
ऑनलाइन विक्रीला अल्पप्रतिसाद
सोन्या-चांदीची दुकाने बंद म्हटल्यावर ऑनलाइन खरेदीत वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र तिथेही विकेत्यांच्या पदरी निराशाच येत आहे. ग्राहकाने ऑनलाइन मागणी के ल्यास दागिने घडवण्यासाठी आणि ते पोहोचवण्यासाठी माणसेच उपलब्ध नाहीत. आर्थिक वर्षांची अखेर असल्याने करभरणा करण्याला ग्राहकांचे प्राधान्य आहे. घरात कुणी आजारी पडल्यास खर्च करावा लागेल हीसुद्धा भीती आहे. त्यामुळे ऑनलाइन सोनेबाजाराची स्थितीही फार चांगली नाही’, अशी माहिती ‘प्रिस्टीन’ संके तस्थळाचे संचालक समीर प्रभू यांनी दिली. ‘ऑनलाइन मागवलेले दागिने घरोघरी पोहोचवण्यासाठी वापरण्यात येणारे डबे चीनवरून आणलेले असतात, अशी अफवा पसरल्याने ग्राहक ऑनलाइन खरेदी करायला तयार नाहीत’, असे आदित्य पेठे म्हणाले.
0 comments:
Post a Comment
Please add comment