यंदा जाचक अटी-शर्तीचा फटका,चिकू विम्यापासून शेतकरी वंचित पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादकांना गेल्या हंगामातील चिकू फळ पीक विम्याची रक्कम अजूनही मिळाली नसल्याने चिकू बागायतीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. यंदाच्या विम्याच्या अटी-शर्तीमध्ये काही जाचक मानांकने घातली गेल्याने अधिकतर शेतकऱ्यांना ५० टक्के विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. |
गेल्या पावसाळी हंगामात पालघर जिल्ह्यातील ३९०० चिकू बागायतदारांनी फळ पीक विमा योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. या शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी २,७५० रुपयांचा विम्याचा हप्ता भरला आहे. चार ते आठ दिवस ९० टक्के सापेक्ष आद्र्रता तसेच २० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाच्या नोंदीच्या आधारे बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५५ हजार रुपयांची विमा रक्कम ३१ डिसेंबरपूर्वी मिळणे अपेक्षित होते.
विमा कंपनीने हवामानाच्या माहितीसाठी स्कायमेट या शासकीय संस्थेचा आधार घेऊन हवेतील सापेक्ष आर्दता व पर्जन्यमान विषयीची माहिती संकलित केली. मात्र डहाणू व परिसरातील शेतकऱ्यांची मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे चिकू फळाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. असे असताना पीक विम्याच्या अटींची पूर्तता होत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये असंतोष पसरला होता. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या अधिकतर शेतकऱ्यांना विम्याचा लाभ होत नसल्याने झालेल्या चिकू पिकाच्या नुकसानीचा फेरआढावा घेऊन फळपीक विम्याचा पुन्हा विचार करण्याची मागणी चिकू बागायतदार संघटनेतर्फे करण्यात आली होती.
काही अपवादात्मक शेतकरी वगळता अधिक तर शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात चिकू पीक विमा मंजूर झाला आहे. पालघर, तलासरीसह डहाणू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना विमा कवचाची ५० टक्के रक्कम मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांनी भरलेल्या विम्याच्या हप्त्याइतकीच रक्कम राज्य शासनाने संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. ही रक्कम भरली गेली नसल्याने विमा भरपाईच्या रकमेचे वितरण अजूनही झालेले नाही. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
उत्पादनावर परिणाम होण्याची भीती
अतिवृष्टी आणि लांबलेला पावसाळा यांमुळे चिकू बागायतदारांचे पावसाळ्यातील अधिकतर उत्पादन संपुष्टात आले होते. त्यामुळे चिकू बागांची साफसफाई करणे, मशागत करणे इत्यादी कामांसाठी लागणाऱ्या खेळत्या भागभांडवलाची कमतरता बागायतदारांना भेडसावत आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून पुन्हा येणाऱ्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम होण्याची भीती चिकू बागायतदार करून व्यक्त केली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment