'करोना'ची लक्षणे गांभीर्याने घेतली पाहिजेत

'करोना'ची लक्षणे गांभीर्याने  घेतली  पाहिजेत 

'स्वाइन फ्लूच्या लक्षणांप्रमाणेच 'करोना'ची लक्षणे असली, तरी या विषाणूचा प्रसार थुंकीद्वारे होतो. थुंकी सुकली नाही, तर हा विषाणू हवेत १७ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. देशात सध्या पाच रुग्णांना लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्या विषाणूची जनुकीय रचना कशी आहे किंवा त्याचे स्वरूप कसे आहे, हे सांगणे अवघड आहे. करोना विषाणूचा अभ्यास सुरू आहे,' अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) संसर्गजन्य विभागाचे प्रमुख डॉ. रमन गंगाखेडकर यांनी दिली. 'देशातील एका व्यक्तीलाही या विषाणूंचा संसर्ग झाल्यास त्याद्वारे देशात संसर्ग पसरू शकतो. 'करोना'च्या संसर्गाचा धोका कायम असला, तरी घाबरण्याचे कारण नाही. त्यासाठी नागरिकांनी सावध राहावे,' असा सल्ला द्यायला ते विसरले नाहीत.

डॉ. गंगाखेडकर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. देशासह परदेशातील करोनाच्या स्थितीवर त्यांनी भाष्य केले. 'देशात चीन तसेच बाधित देशातून आलेल्या तीन ते पाच जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृत्यू झालेल्या तरुणाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. तरीही पुन्हा एकदा पुण्याच्या 'एनआयव्ही'त चाचणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. 'करोना'च्या विषाणूचा संसर्ग मानवाद्वारे मानवाला झाल्यास तो पसरू शकतो. परिणामी 'करोना'ची साथ वेगाने पसरू शकते,' अशी भीती डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केली.

'देशातील नागरिकाला त्याची लागण झाल्यास आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला संसर्ग झाल्यास देशात खऱ्या अर्थाने लागण वाढण्याची भीती आहे. तत्पूर्वी करोनाच्या विषाणूचा अभ्यास सुरु केला आहे. मात्र, देशातील व्यक्तीला लागण झाल्यानंतरच करोनाच्या विषाणूची जनुकीय रचना कशी आहे, त्याचे स्वरूप कसे आहे किंवा तो 'म्युटेट' होतो का याबाबत सांगणे शक्य होईल. त्यावर अभ्यास सुरू आहे. करोना विषाणू थुंकीद्वारे पसरतो. जर बाधित व्यक्ती सार्वजनिक जागी थुंकली, तर त्याद्वारे संसर्ग होऊ शकते. ही थुंकी न वाळल्यास त्यात १७ दिवस विषाणू जिवंत राहू शकतात. त्यामुळे रस्त्यावर थुंकू नये, कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत यासारख्या छोट्या गोष्टींची खबरदारी नागरिकांनी बाळगणे आवश्यक आहे,' असा सल्ला डॉ. गंगाखेडकर यांनी दिला.चाचणी 'निगेटिव्ह' आल्या नंतरही इतर आजारांचा शोध

सध्या देशात अनेक संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आले आहेत. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. त्या वेळी करोनाची चाचणी करताना त्या रुग्णाची एच१एन१, एच३एन२ या फ्लूच्या चाचण्या केल्या जात आहेत. इतर आजार असल्यास साधा फ्लू किंवा अन्य लक्षणे असून तो पॉझिटिव्ह असल्यास त्याची माहिती दिली जाते. सध्या संशयित रुग्णांची चाचणी करून ती निगेटिव्ह आली असून, त्यांना साधा फ्लूसुद्धा झालेला नाही. चीनमध्ये 'करोना'मुळे दीर्घकालीन परिणाम झाले आहेत. शाळा, कॉलेज बंद झाले आहेत. कंपन्या, कारखाने बंद आहेत. करोनाची साथ पसरल्यास आपल्या देशात हेच चित्र दिसेल. ज्यांना रक्तदाब, मधुमेहाचा आजार आहे अशा व्यक्तींना 'करोना'ची लागण होण्याची शक्यता जास्त असते. देशात हा विषाणू आल्यास त्याला रोखणे अवघड होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

सध्या देशात १४ लॅब कार्यान्वित

देशात पाच रुग्ण आढळले आहेत. तीन हजार रुग्णांची चाचणी करण्यात आली. देशात १४ प्रयोगशाळा कार्यान्वित आहे. येत्या दोन दिवसांत देशात ३३ ठिकाणच्या प्रयोगशाळा कार्यान्वित केल्या जातील. देशात 'करोना'ची लागण होण्यास सुरुवात झाली, तर त्या वेळी 'एनआयव्ही'वर ताण येऊ नये यासाठी गरज पडल्यास १०६ ठिकाणी प्रयोगशाळा कार्यान्वित केल्या जातील. अनेक प्रयोगशाळा सुरू करून देशात पॅनिक स्थिती निर्माण करायची नाही, अशी माहिती डॉ. गंगाखेडकर यांनी दिली.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment