![]() |
CoronaVirus | इटलीमध्ये चीनपेक्षा अधिक बळी |
करोना संसर्गामुळे जगभरात दहा हजार लोकांचा मृत्यू
करोनाच्या जागतिक संसर्ग साथीत इटलीत गुरुवापर्यंत ३,४०५ बळी गेले असून दर दहा मिनिटाला एक या प्रमाणे मृत्यूचा वेग होता. चीनमध्ये आतापर्यंत ३,२४५ बळी गेले आहेत. चीनमधील वुहान प्रांतात करोनाचा उगम असल्याचे मानले जात असून तेथे झालेल्या मृत्युंपेक्षा आता इटलीमधील मृत्युंची संख्या १६० ने अधिक झाली आहे. इटलीची लोकसंख्या सुमारे ६० दशलक्ष आहे. चीनची लोकसंख्या त्यापेक्षा वीसपटीहूनही जास्त आहे.
३.९ कोटी लोकसंख्या असलेल्या कॅलिफोर्नियात सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. तेथे अतिशय कठोर उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे. जगभरातील बळींची संख्या आता १० हजारांवर गेली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका मलेरियावरील औषधांचा वापर करोनावर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मूळ करोना विषाणू जेव्हा सामोरा आला, तेव्हा चीनने जगाला त्याची माहिती वेळीच दिली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
चीनमध्ये शुक्रवारी एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. लागोपाठ दुसऱ्या दिवशी एकही रुग्ण सापडलेला नसल्याने तेथे समाधान व्यक्त केले जात आहे. चीनमध्ये आशेचा किरण दिसत असताना आता जगाच्या इतर भागात करोनाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी व्यवहार बंद ठेवण्यात आले. अनेक देशांनी त्यांच्या सीमा बंद केल्या असून व्यवहार बंद केल्यामुळे लाखो लोक घरातच आहेत.
करोनाला गांभीर्याने घेतले नाही तर लाखो लोक बळी पडतील, अशी भीती संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जागतिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी लाखो डॉलर्सच्या आर्थिक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
फ्रान्समध्ये गेल्या चोवीस तासांत १०८ बळी गेले असून मृतांची संख्या ३७२ झाली आहे. जागतिक पातळीवर मृतांचा आकडा दहा हजारांवर गेला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनिया गट्रेस यांनी सांगितले, की विषाणूचे फार घातक परिणाम होत असून जर तो असाच वणव्यासारखा पसरत राहिला, तर त्यातून लाखो लोक मरण पावतील. इटलीचे पंतप्रधान गिसीपी काँट यांनी सांगितले, की इटली देश बंद ठेवण्याची मुदत आता ३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फ्रान्स बंदची मुदत दोन आठवडय़ांनी वाढवण्याचा विचार बोलून दाखवला आहे. दरम्यान अर्जेटिनाचे अध्यक्ष अल्बटरे फर्नाडेझ यांनी सांगितले, की २० ते ३१ मार्च
या काळात देश बंद ठेवण्यात येणार आहे. अमेरिकेत कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी सांगितले, की राज्यातच गुरुवारी सायंकाळपासून बंदी लागू करण्यात आली. तेथील सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले, की जर लोकांनी सरकारचा सल्ला मानला, तर १२ आठवडय़ात करोना संसर्गावर मात करता येईल.
ट्रम्प यांचा चीनवर आरोप
करोनाच्या आपत्तीत ढिसाळ प्रतिसाद दिल्याने टीका झालेले अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, की चीनने साथ सुरू झाल्यानंतर लगेच जगाला माहिती दिली नाही, त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. चीनमध्ये त्या विशिष्ट भागात ती साथ थोपवता आली असती पण आता जग चीनच्या कृत्यांची मोठी किंमत मोजत आहे. औषध योजनेबाबत त्यांनी म्हटले आहे, की मलेरियावरील क्लोरोक्विन व हायड्रोझायक्लोरोक्विन ही औषधे करोनावर गुणकारी ठरली आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment