CAA वरुन राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. नागरिकत्व कायद्याचे समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत २२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दिल्लीतल्या अनेक भागात सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान झालं होतं. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिस कर्मचाऱ्यालाही आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक पोलिस कर्मचारी जखमी झालेत.
दिल्लीत सुरु असलेल्या या हिंसाचारावर आता भारतीय क्रिकेटपटूंनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. युवराज सिंह, विरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्व नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे.
दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. भाजपा नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्राने कुठलीही कारवाई न केल्यामुळे हा हिंसाचार वाढला असा आरोप त्यांनी केला.
0 comments:
Post a Comment
Please add comment