‘टीएमटी’ची नव्या जोमाने धावणार

ठाणे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय देऊ न शकल्याबद्दल नेहमीच टीकेची धनी ठरलेल्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने (टीएमटी) नव्या आर्थिक वर्षांत नव्या जोमाने बससेवा चालवण्याचा संकल्प सोडला आहे. उपक्रमाचा २०२०-२१ या वर्षांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करताना प्रशासनाने दीडशे मिनीबस खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. त्याखेरीज सध्या बस आगारांत धूळखात पडून असलेल्या १०३ सीएनजी बसगाडय़ाही दुरुस्त करून चालवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तसे घडल्यास लवकरच ठाणेकरांचा रस्ते प्रवास सुखकर होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिका प्रशासनाने टीएमटीच्या बस तिकीटदरांत वाढ करण्याचा प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मांडला आहे. मात्र, टीएमटीच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीचा कोणताही प्रस्ताव नसल्याने ही दरवाढ टळल्याचे दिसून येत आहे.
ठाणे परिवहन उपक्रमाच्या वागळे आगारामधील कै. मीनाताई ठाकरे सभागृहामध्ये मंगळवारी अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेमध्ये परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांच्याकडे २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा ४३८ कोटी ८६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यात प्रामुख्याने बसच्या संख्येत वाढ करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.
पुणे येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एक लाख लोकसंख्येसाठी ३० बसगाडय़ा असणे गरजेचे आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात गेली असून या लोकसंख्येसाठी ७२० बसगाडय़ांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत टीएमटीच्या ताफ्यात ४७७ बसगाडय़ा असून त्यापैकी ३४० बसगाडय़ा विविध मार्गावर चालविण्यात येतात. उर्वरित १३७ बसगाडय़ा नादुरुस्त असून त्यापैकी १०३ सीएनजी बसगाडय़ा एएमसी तत्त्वावर दुरुस्त करून चालविण्याचे नियोजन अर्थसंकल्पात आखण्यात आले आहे. तसेच परिवहन उपक्रमामार्फत ५० मिडीसाठी खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून या निधीतून मिडीऐवजी बेस्टच्या धर्तीवर १८ आसन क्षमता असलेल्या मिनीपोस्ट बस खरेदी करण्याची प्रशासनाची योजना आहे. त्यामुळे ५० मिडी बसच्या खर्चाममध्ये दुप्पट म्हणजेच १०० मिनीपोस्ट बस उपलब्ध होणार आहेत. तसेच अशाच प्रकारच्या आणखी ५० बसगाडय़ा पीपीपी तत्त्वावर घेण्याची प्रशासनाने योजना आखली आहे. येत्या जुलै महिन्यापर्यंत या बसगाडय़ा टीएमटीच्या दाखल करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यामुळे २५३ अतिरिक्त बसगाडय़ा ठाणेकरांना प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, तेजस्विनीच्या उर्वरित २० गाडय़ाही लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment