टिकटॉकवरील खेळ खेळताना आठवीतील विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सांगलीत घडली असून या प्रकारामुळे पालकवर्गामध्ये खळबळ उडाली आहे. एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारामध्ये हा प्रकार घडला असून यामध्ये मुलाच्या हाताला गंभीर इजा झाली असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
किशोरवयीन मुलामध्ये लोकप्रिय असलेल्या टिकटॉक खेळाचे वेड शाळकरी मुलामध्येही पसरले असून याची अनुभूती सांगलीत आली. एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात काही मुले टिकटॉकवर लोकप्रिय असलेल्या ‘स्कल ब्रेकर चॅलेज’ या नावाच्या खेळाचे प्रात्यक्षिक करीत असताना पृथ्वीराज प्रशांत देसाई हा आठवी इयत्तेत शिकत असलेला विद्यार्थी जखमी झाला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये मुलाचा हात मोडला असून त्याला प्लॅस्टर करण्यात आले आहे. तर त्याच्या पायाला आणि डोक्यालाही दुखापत झाली आहे.


तीन मुलांनी किंवा मुलींनी सामुदायिक उडी मारल्यानंतर दोन्ही बाजूला उभे राहिलेल्यांनी मधल्या मुलाच्या पायावर मारून त्याला पाडण्याचा एक व्हीडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अपघातग्रस्त मुलाला घेऊन शाळेतील दोन मुलांनी असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. ‘टिकटॉक’वरील या व्हिडिओ बाबत जखमी विद्यार्थ्यांस काही कल्पना नव्हती, असे जखमी मुलाच्या पालकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे हा गेम खेळण्यास तो तयार झाला आणि त्यात त्याला ही दुखापत झाली. मुले असे व्हिडिओ पाहणार नाहीत याची पालकवर्गाने काळजी घेणे तसेच याबाबत शिक्षकांनी प्रबोधन करण्याची गरज असल्याचे जखमी मुलाचे वडील प्रशांत देसाई यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment
Please add comment